केदारनगरातील एक नागरिक सकाळी ९ वाजेच्या सुमारास पिंपळाच्या झाडाला पाणी टाकण्यासाठी गेलेला होता. यावेळी या नागरिकाला नाल्यातील पाण्यात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह दिसून आला. त्या नागरिकाने नगरसेवक अतुल बारी यांना व रामानंदनगर पोलिसांना हा प्रकार सांगितला. त्यानुसार घटनेची माहिती मिळाल्यावर अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, रामानंद नगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजय शिंदे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी आले. मृतदेह कुजलेला असल्याने तो गेल्या चार ते पाच दिवसांपासूनच असावा. अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. हा मृतदेह नाल्याच्या पाण्यात वाहून आला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला तरी दुसरीकडे घातपाताच्या अनुषंगानेही पोलिस तपास करीत आहेत.
मृतदेह नाल्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला यावेळी,मृतदेह कुजलेला असल्याने मृतदेहाचे शीर धडापासून वेगळे झाले होते. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात नोंद करण्यात आली आहे. मयताच्या एका हातावर त्रिशुल तसेच ओम असं अक्षर गोंधलेले आहे. तर दुसऱ्या हातावर तात्या असे नाव गोंधलेले असल्याचे दिसून येत आहे. यावरुन मयताची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केलं आहे.