Solapur News : सोलापूर (Solapur) ग्रामीण पोलीस दलाच्या ऑपरेशन परिवर्तन उपक्रमातंर्गत आयोजित हस्तकला आणि शिवणकाम प्रदर्शनाचं उदघाटन ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांच्या हस्ते पार पडले. अवैध दारू व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या हाताला नवीन उद्योग मिळावा यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या पुढाकारानं ऑपरेशन परिवर्तन सुरू करण्यात आलं होतं. सोलापूर जिल्ह्यातील विविध तांड्यावर हा उपक्रम राबवण्यात आला होता. पारंपारिक बंजारा हस्तकला, शिवणकाम  यांना मॉडर्न रूप देत विविध वस्तू  साकारण्यात आले आहेत. कधीकाळी दारू विक्री करणाऱ्या या हातांना नवीन काम तर मिळालं, मात्र त्यांनी तयार केलेल्या साहित्याची विक्री व्हावी यासाठी तीन दिवसीय प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भटक्या विमुक्त आयोगाचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण रेणके हे देखील उपस्थित होते. 

दारूचा व्यवसाय हा अतिशय प्राचीन काळापासून सुरू आहे. लोकमान्य टिळकांनी दारूबंदीसाठी मोठ आंदोलन उभं केलं होतं. महात्मा गांधी यांनी देखील दारू व्यवसायाला विरोध केला होता. बंजारा समाजाचे मूळ काम सैन्याला धान्य पुरवठा करणं हे होतं. कालांतरानं मात्र यामध्ये बदल होत गेला. बंजारा समाजाची विशेष अशी पारंपारिक वेशभूषा आहे. ती हस्तकला, शिवणकला टिकली पाहिजे, असं मत या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांनी व्यक्त केलं.

भटक्या विमुक्तांचा प्रश्न हा केवळ भटक्या विमुक्तांचा नाही तर संपूर्ण देशाचा प्रश्न आहे. त्यांच्या या प्रश्नाकडे संवेदनशीलपणे पाहणं फार महत्त्वाचं आहे. भटक्या विमुक्तांचे मूळ प्रश्नच अनेकांना माहिती नाहीत. भटके विमुक्त स्वातंत्र्यलढ्यात लढलेली माणसं आहेत त्यामुळे त्यांना जगण्याची संधी द्या, असं मत भटके विमुक्त आयोगाचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण रेणके यांनी यावेळी व्यक्त केलं.

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी एक वर्षांपूर्वी ऑपरेशन परिवर्तनाची सुरुवात केली होती. हातभट्टीचे उच्चाटन करण्यासाठी चतुसूत्रीचा वापर करून हे उपक्रम राबविण्यात आले. अवैध हातभट्टींच्या अड्ड्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात आल्या. त्यामुळे हे व्यवसायिक देखील हतबल झाले होते. त्यांना या व्यवसायापासून कायमचे दूर करण्यासाठी नवे उभे करून देण्याची गरज होती. यातूनच ऑपरेशन परिवर्तनची संकल्पना सुचली. बंजारा समाजात विशेष अशी वेशभूषा आहे. त्यांच्या हातात कला देखील आहे. त्यांना आधुनिकतेची जोड देत विविध साहित्य तयार करण्यात आले आहेत. त्यांच्या विक्रीची सुरुवात म्हणून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.

सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयात हे प्रदर्शन आणि विक्री शनिवारी आणि रविवारी दोन दिवस सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत चालणार आहे. विविध हस्तकला, शिवणकाम, पेटिंग या प्रदर्शनात आहेत. सर्व नागरिकांना हे खुले आहे. त्यामुळे सोलापूरकरांनी या प्रदर्शनात प्रतिसाद द्यावा असे आवाहन देखील सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here