मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी केलेलं वक्तव्य अंगलट येण्याची शक्यता आहे. “आपण सर्वांनी मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे आपल्या सर्वांना दु:ख झाले” असं चंद्रकांतदादा म्हणाले होते. मात्र या भाषणाचा व्हिडिओ आता भाजपच्या सोशल मीडिया पेजवरुन हटवण्यात आला आहे. पनवेलमध्ये आयोजित भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत पाटील बोलत होते.

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते?

गेल्या अडीच वर्षातील चित्र पाहिल्यानंतर राज्यात सत्ता बदलण्याची गरज होती आणि तसा बदल झाला. हा बदल होत असताना असा एक नेता देण्याची गरज होती, जो योग्य मेसेज देईल. जो चांगल्या निर्णयांना स्थिरता देईल. असे असताना आपण सर्वांनी मनावर दगड ठेवून, देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे आपल्या सर्वांना दु:ख झाले. वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्ष मुख्यमंत्री राहिले ते देवेंद्र फडणवीस होय, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

हेही वाचा : किमान शब्दांत कमाल अपमान! शरद पवारांनी नितेश राणेंना अनुल्लेखानेच मारले

एकनाथ शिंदेंना जड अंतकरणाने मुख्यमंत्री केल्याचं वक्तव्य खुद्द प्रदेशाध्यक्षांनीच केल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. शिंदे गट आणि भाजप युतीच्या सुरुवातीलाच, तेही मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याअगोदर मनातील कटुता व्यक्त करणारं विधान भाजपकडून आलं आहे. चंद्रकांतदादांचं वक्तव्य ही भाजपची भूमिका असल्याचा समज शिंदे गटात निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षात दुरावा येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच भाजपने भाषणाचा व्हिडिओ ट्विटर, यूट्यूबसारख्या डिजिटल माध्यमांवरुन डिलीट केल्याची चर्चा आहे.

हेही वाचा : चंद्रकांतदादा म्हणाले मनावर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्री केलं, शरद पवारांची खोचक प्रतिक्रिया

पाच वर्ष मुख्यमंत्री राहिल्यानंतर कोणाला वाटलं नव्हतं, पण केंद्राने निर्णय दिला आणि देवेंद्रजींनी तो मानला. यासाठी आपण सर्वांनी त्यांना सॅल्यूट केला पाहिजे, असे सांगत सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांनी फडणवीस यांना सॅल्यूट केला.

शरद पवारांचीही टीका

छातीवर दगड ठेवायचा की डोक्यावर दगड ठेवायचा हा त्यांचा प्रश्न असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. संपूर्ण सत्ता केंद्रीत करुन ठेवत दोघांनी सरकार चालवायचं ठरवल्याचं दिसतंय. ते सत्ताधारी आहेत, काय करतात ते करु द्या, आम्ही विरोधी पक्षात आहोत, असं शरद पवार म्हणाले.

हेही वाचा : गुलाबराव पाटलांचा झटका, आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसाला दिलेली ती रुग्णवाहिका घेतली परत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here