पुणे : बाबासाहेब पुरंदरेंची भाषणं आणि त्यांच्या लिखाणाएवढा अन्याय शिवछत्रपतींवर दुसरा कुणीही केला नाही, असं परखड मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केलं. तसेच शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेवांचं योगदान काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शिवचरित्र ग्रंथ प्रकर्षण सोहळा आज पुण्यामध्ये पार पडला. त्यावेळी भाषणात ते बोलत होते.

इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरित्र आणि विचारप्रवाह या ग्रंथाचे प्रकाशन आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी इतिहास अभ्यास राजकुमार घोगरे, श्रद्धा कुंभोजकर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष छत्रपती शाहू महाराज उपस्थित होते.

शिवछत्रपतींवर पुरंदरेंएवढा अन्याय कोणी केला नाही

“महात्मा फुले यांनी रायगडावरील शिवछत्रपतींची समाधी शोधली. त्यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख छत्रपती असा न करता ‘कुळवाडी भूषण’ असा केला. मात्र बाबासाहेब पुरंदरे यांनी खोटा इतिहास पसरवला. माझ्यामते शिवछत्रपतींवर इतका अन्याय कोणी केला नाही. शिवचरित्राच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या बाबासाहेबांच्या लिखाणातून छत्रपती शिवजी महाराजांवर सर्वाधिक अन्याय झाला”, असं पवार म्हणाले.

मनावर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्रिपद, चंद्रकांतदादांचा व्हिडिओ भाजपने हटवला?
शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत रामदास, दादोजी कोंडदेवांचे योगदान काय?

“अन्य घटकांचं महत्व वाढवण्याचे काम त्यांनी केलं. मात्र रामदासांचे योगदान काय, दादोजी कोंडदेवांचे योगदान काय? शिवाजी महाराजांना ज्यांनी दिशा दिल्या. त्या फक्त जिजाऊ होत्या. सत्य गोष्टी अनेकांना न पटणाऱ्या आहेत. त्यांच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही, असं पवार म्हणाले. पुरंदरेंनी जे काही लिखाण केलं, जी काही मांडणी केली, ती मांडणी ज्याला सत्यावर विश्वास आहे तो घटक कधीही मान्य करणार नाही. काही व्यक्तींचं महत्व वाढवण्यासाठी त्यांनी विशेष काळजी घेतल्याचं दिसून येतं”, असंही पवार म्हणाले.

Sharad Pawar: किमान शब्दांत कमाल अपमान! शरद पवारांनी नितेश राणेंना अनुल्लेखानेच मारले
सरकारने दादोजी कोंडदेव पुरस्कार देणे बंद केले

“राज्य सरकारने काही वर्षांपूर्वी गुरुजनांचा दादोजी कोंडदेव यांच्या नावाने पुरस्कार सुरू केला होता. त्यावर वाद झाला होता. त्यावर सरकारने समिती नेमली. त्यात दादोजी कोंडदेव आणि शिवाजी महाराज यांचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सरकारने दादोजी कोंडदेव पुरस्कार देणे बंद केले”, असं पवार म्हणाले.

नव्या पिढीसमोर वास्तववादी इतिहास येण्याची गरज

“देशात आदिलशाही आली. मोघलांचे राज्य आले. यादवांचे राज्य आले. ते राज्य त्यांच्या नावाने ओळखले गेले पण शिवछत्रपतींचे राज्य हे भोसलेंच्या नावाने ओळखले गेले नाही तर ते रयतेचे राज्य म्हटले गेले. जनतेने जनतेसाठी केलेले राज्य म्हणून ते मानले गेले, असंही शरद पवार म्हणाले. यावेळी नव्या पिढीसमोर वास्तववादी इतिहास येण्याची गरज आहे”, असे प्रतिपादन शरद पवार यांनी केले. यासाठी संसदेच्या अधिवेशनानंतर बैठकही घेऊ, असंही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here