औरंगाबादचा दौरा आटोपून दुपारी आदित्य ठाकरे यांचे नगर जिल्ह्यात आगमन झाले. नेवासा फाटा येथे युवा नेते उदयन गडाख, शिवसेनेचे उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे व शिवसैनिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. भर पावसातही मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला,’ अशा घोषणा देत ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. तुम्ही पावसात भिजत असताना मी छत्री घेणार नाही, असे म्हणत ठाकरे यांनी पावसात भिजतच कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
डोक्यावर पाऊस पडत असला ती त्यापेक्षा मोठा प्रेमाचा आणि आशिर्वादाचा पाऊस तुमच्याकडून सुरू
ठाकरे म्हणाले, ‘डोक्यावर पाऊस पडत असला ती त्यापेक्षा मोठा प्रेमाचा आणि आशिर्वादाचा पाऊस तुमच्याकडून सुरू आहे, तो मला महत्वाचा आहे. सरकार पडल्यावरही एवढे प्रेम मिळाले, हे पाहून मी भारावून गेलो आहे. सर्व काही सुरळीत सुरू असताना आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी गद्दारी केली. त्यांना आपण काहीही कमी केले नव्हते. मात्र, त्यांच्यावर यासाठी काही दडपण असेल. आता त्यांना जेथे राहायचे असेल तेथे त्यांनी आनंदात रहावे. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावे. मुख्य म्हणजे आपण गद्दारी का केली? हे लोकांना पटवून द्यावे. अशी गद्दारी महाराष्ट्र कधीच खपवून घेणार नाही,’ असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
संकटाच्या काळात गडाख कुटुंब पाठिशी उभे, आभार कसे मानू?
माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या बद्दल बोलताना ठाकरे म्हणाले, ‘सरकार पडल्यानंतर नेवाशात घेतलेली गडाख यांची सभा पाहून मला ताकद आणि हिंमत मिळाली. असेही लोक आपल्यासोबत आहेत, आपल्यावर प्रेम करीत आहेत, हे पाहून समाधान वाटले. गडाख आणि माझी तशी दोन-अडीच वर्षांचीच ओळख. मात्र, पडत्या काळात गडाखांनी आम्हाला साथ दिली. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी माझे वडील उध्दव ठाकरे यांना फोन करून धीर दिला. आम्ही तुमच्यासोबत असल्याचे सांगितले. यालाच आशीर्वाद, प्रेम, महाराष्ट्र धर्म, हिंदुत्त्व म्हणतात,’ असेही ठाकरे म्हणाले.
आपल्या काळात कुठेच दंगल झाली नाही, ही यांची पोटदुखी
सरकारच्या कामगिरीबद्दल ठाकरे म्हणाले, ‘अडीच वर्षांच्या काळात आपल्या सरकारने खूप कामे केली. कोविडमध्ये राज्याची काळजी घेतली. त्याचे जगाने कौतुक केले. आपल्या सरकारचा पहिला निर्णय हा रायगडासाठी साडेसहाशे कोटी देण्याचा होता. तर शेवटचा निर्णय औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा होता. या काळात आपण कोठेही जातीय-धार्मिक वाद वाढू दिला नाही. विकास होत होता, सगळे एकत्र राहत होते. कुठेही दंगल झाली नाही. कदाचित हे पाहूनच त्यांच्या पोटात दुखत असेल’, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला.