मुंबई: प्रत्येक पक्षाला वाढण्याचा अधिकार आहे. आपण मोठं व्हावं असं प्रत्येकाला वाटतं आणि त्यात गैर काहीच नाही. मात्र तुम्हीच आत्मघातीपणा करायचं ठरवलं तर कोण काय करणार, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेनेतील फुटीवर भाष्य केलं. तुम्ही सत्तेसाठी काहीही करायचं, कोणासोबतही जायचं आणि पक्ष अडचणीत आल्यावर बाळासाहेबांच्या नावानं सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करायचा, असं म्हणत राज यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं आहे.

शिवसेनेतून याआधीही अनेकजण बाहेर पडले. छगन भुजबळ, नारायण राणेंनी बंडखोरी केली. मात्र मी बंड केलं नव्हतं. मी बाळासाहेब ठाकरेंना सांगून पक्ष सोडला. त्यावेळी माझ्यासोबत काही मोजके नेते होते. बाळा नांदगांवकर त्यावेळी शिवसेनेतून बाहेर पडले. नांदगांवकर त्यावेळी आमदार होते. ते सेनेच्या तिकिटावर निवडून आले होते आणि पक्षातून बाहेर पडल्यावर ते सेनेचा व्हिप पाळत होते. बाळासाहेबांच्या पक्षातून बाहेर पडून स्वत:चा पक्ष स्थापन करणं हे अत्यंत आव्हानात्मक होतं आणि मी ते आव्हान पेललं. शिवसेनेतून अनेकजण सत्तेसाठी बाहेर पडले. इतर पक्षांमध्ये गेले. मी तसं केलं नाही. मी स्वत:चा पक्ष स्थापन केला. त्यामुळे सेना सोडलेल्या इतर नेत्यांमध्ये आणि माझ्यामध्ये फरक आहे, असं राज म्हणाले. ‘झी २४ तास’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
शिवसेना फुटली, फडणवीसांना म्हटलं, फुकटचं श्रेय घेऊ नका, ते श्रेय उद्धव ठाकरेंनाच : राज ठाकरे
शिवसेनेच्या ४० आमदारांचा पाठिंबा असलेल्या एकनाथ शिंदेंनी पक्षावरच दावा सांगितला आहे. त्यासाठी पक्षात उभी फूट असल्याचं शिंदे यांना सिद्ध करावं लागेल. त्यात त्यांना अपयश आल्यास त्यांच्यापुढे दुसऱ्या पक्षात विलीन होण्याचा पर्याय असेल. शिंदे गट मनसेमध्ये विलीन होईल अशी चर्चा मध्यंतरी सुरू होती. त्यावर राज यांनी भाष्य केलं. शिंदे गटाकडून तसा प्रस्ताव आल्यास नक्की विचार करू, असं ठाकरे म्हणाले.
तो माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही, उद्धव ‘दादू’बद्दल राज ठाकरेंच्या कोरड्या भावना
चाळीस आमदारांचं विलिनीकरण हा तांत्रिक मुद्दा आहे. अनेक वर्तमानपत्रांमध्ये मी हा विषय वाचला. त्या आमदारांकडून विलिनीकरणाचा प्रस्ताव मी नक्कीच विचार करेन, असं राज यांनी म्हटलं. इतके आमदार पक्षात आले तर मनसे कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होईल असं वाटतं का? असा प्रश्न राज यांना विचारण्यात आला. त्यावर माझ्यासाठी आधी मनसैनिक. बाकीचे नंतर, असं उत्तर राज यांनी दिलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here