रत्नागिरी : कोकणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गट आमने-सामने आले असून जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. तसंच कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीचेही प्रकार घडत आहेत. खेड येथील शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी घेतलेल्या बैठकीनंतर वातावरण तापलं आहे. रामदास कदम आणि बंडखोर आमदार योगेश कदम समर्थकांनी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम यांना जाब विचारत जोरदार घोषणाबाजी केल्याने त्यांना आपली बैठक आवरती घेत काढता पाय घ्यावा लागला. पण या बैठकीनंतर युवासेना जिल्हाप्रमुख अजिंक्य मोरे यांनी माजी नगरसेवक सतीश उर्फ पप्पू चिकणे यांना कार्यकर्त्याच्या मोबाईलवरून हात-पाय तोडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

‘तू तूझ्या घरी थांब, तुझ्या तंगड्या तोडतो आणि जीवे मारतो,’ अशी धमकी अजिंक्य मोरे यांच्याकडून देण्यात आल्याचा आरोप सतीश चिकणे यांनी प्रसारमाध्यमांसमोर केला आहे. ‘अजिंक्य मोरे या माणसाकडे बंदूक आहे. त्यामुळे उद्या माझ्या जीवितीला धोका निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर मी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हे लोक खेडमधील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. इथे कोणतीही गटबाजी नाही, मात्र तरीही मला मोरे यांनी ठार मारण्याची धमकी असून याप्रकरणी खेड पोलीस पुढे योग्य ती कारवाई करतील,’ असा विश्वास सतीश चिकणे यांनी व्यक्त केला आहे.

शिवसेनेला शेवटची संधी? संसदीय पक्षातील फूट उघड न होऊ देण्यासाठी उचलावं लागेल ‘हे’ पाऊल

शिंदे समर्थकांची चिपळूण येथे बॅनरबाजी; वातावरण तापणार

शिवसेनेचे चिपळूण शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापुरात केलेल्या मदतीसाठी आभार मानत त्यांच्या समर्थनार्थ लावलेले बॅनर अज्ञातांनी काढल्याने काही काळ शहरात तणाव निर्माण झाला होता. मात्र हे बॅनर पुन्हा त्या जागेवर लावण्यात आले आहेत. त्यामुळे आता या मुद्द्यावरूनही चिपळूण येथे पुन्हा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस सतर्क झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here