Vasantdada Patil : आजचा दिवस (24 जुलै) हा सांगलीच्या इतिहासातील शौर्य दिवस म्हणून ओळखला जातो. कारण 24 जुलैची ती क्रांतिकारकांची ऐतिहासिक उडी आणि सांगलीतील तुरुंग फोडण्याच्या घटनेला आज 79 वर्षे पूर्ण होत आहेत. चित्तथरारक असा तो दिवस आणि त्या दिवसाची शौर्यगाथा ही अनोखीच आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील (Vasantdada Patil) आणि त्यांचे रक्तबंबाळ झालेले सहकारी भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या पाऊलखुणा आहेत. दरम्यान, आजच्या दिवशी म्हणजे 24 जुलै 1943 वसंतदादा पाटील यांनी तुरुंगातून कशी सुटका केली. या दिवशी नेमकं काय घडलं होतं, याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत…

22 जून 1943 ला वसंतदादांना अटक

22 जून 1943 रोजी रात्री वसंतदादा पाटील आणि हिंदूराव पाटील सांगली शहरातील जयश्री टॉकीजला सिनेमा पहायला गेले होते. सिनेमा पाहून रात्री फौजदार गल्लीतील आपल्या मुक्कामावर आले. त्यांच्या शोधासाठी कित्येक दिवसरात्र एक करुन कंटाळलेल्या पोलिसांना वसंतदादा फौजदार गल्लीत असल्याची बातमी कोणीतरी दिली. पोलीस सशस्त्र फौजफाटा घेवून फौजदार गल्लीत आले. एकंदर परिस्थिती हाताबाहेर गेल्याचा दादांना अंदाज येताच त्यांनी पोलिसांच्या स्वाधीन होण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी दादांसह सर्वांना अटक करुन सांगलीच्या तुरुंगात नेलं. 

देशात स्वातंत्र्यासाठी चाललेले क्रांतियुद्ध आणि त्यात स्वतः उतरुन लढण्याची त्यांची तळमळ आणि जिद्द यामुळं ते तुरुंगात अडकून पडणे शक्य नव्हतं. दादा व क्रांतिवीरांच्या विरोधात खटले दाखल करुन त्यांना कडक शिक्षा व्हावी, या प्रयत्नात पोलीस होते. तर दादा मात्र कोणत्याही परिस्थितीत तुरुंग फोडून बाहेर पडण्याच्या तयारीला लागले होते. अखेर तो दिवस उजाडला. शनिवार तारीख 24 जुलै 1943.

निकाल लागण्यापूर्वीच तुरुंगातून पळून जाण्याचा निर्धार 

दादांचे वकील पाटणकर यांना सेशन्स कोर्टात काम निघाल्याने सोमवार 26 जुलै 1943 ची तारीख निकालासाठी देण्यात आली होती. निकाल लागण्यापूर्वीच तुरुंगातून पळून जाण्याचा निर्धार दादांनी केला. दुपारी अडीचच्या सुमारास शौचाचे निमित्त करुन दादा खोलीच्या बाहेर पडले. तुरुंगातील इतरही क्रांतिवीर शौचासाठी बाहेर पडले. नियोजनाप्रमाणे सर्व क्रांतीकारी बराकीतून बाहेर आले. दादा, बंदूकधारी पहारेकरी आणि हिंदुराव पाटील सोबत होते. त्याच संधीचा फायदा घेत दादांनी पहारेकऱ्यास घट्ट पकडले. हिंदुराव पाटलांनी बंदूक हिसकावून घेतली आणि ते तुरुंगाच्या प्रवेशद्वाराकडे धावले. तुरुंगाच्या तटावरील व घंटीजवळील बंदूकधाऱ्यांकडील बंदूकाही हिसकावून घेण्यात आल्या. वसंतदादांसह सर्वजण तटाकडे धावत सुटले. तटावर गेले. तटाभोवतीच्या खंदकात भरपूर पाणी होतं. त्यामुळं पोहून जाणं सोपं होतं. दादांसह सर्वांनी खंदकात उड्या मारल्या. शेवटी हिंदुराव पाटलांनी खंदकात उडी मारली. दुर्दैवाने त्यांची उडी खंदकातील पाण्यात पडण्याऐवजी काठावर पडल्यामुळं त्यांचे दोन्ही पाय मोडले. पाय मोडल्यामुळं त्यांना प्रयत्न करुनही जागचे हालता आले नाही. बाकी सर्व क्रांतिवीर हवेत गोळीबार करत दादांसोबत सांगलीच्या बाजारात येऊन कृष्णा नदीकडे धावत सुटले.

वसंतदादांच्या खांद्यातून गोळी आरपार गेली

क्रांतिकारकांनी तुरुंग फोडल्यामुळं पोलीस यंत्रणा त्वेषाने पाठलाग करत होती. पुढे हवेत गोळीबार करत बेफाम सुटलेले क्रांतिकारक आणि पाठीमागे धावणारे पोलीस व घोडेस्वार. धावून धावून थकलेले आण्णासाहेब पत्रावळे एका ठिकाणी थांबले. त्यांनी शरणागती पत्करुनही पोलिसांना दया आली नाही. ते गोळीचे शिकार बनले. ते देशासाठी हुतात्मा झाले. पुढे कृष्णानदीपर्यंत पोहोचलेल्या बाबुराव जाधवांनी नदीत उडी घेतली. पण ते पोलिसांच्या गोळीला बळी पडले. रक्ताने माखलेला त्यांचा देह कृष्णा नदीत वाहून गेला. एका क्रांतिकारकाला कृष्णामाईने आपल्यात सामावून घेतलं. हे सर्व दादांच्या डोळ्यासमोर घडत होते. दादा मात्र मोठ्या हिंमतीनं आलेल्या प्रसंगाला सामोरे जात पोलिसांशी लढत होते. त्यांनी एका उंबराच्या झाडाचा आश्रय घेतला. दुर्दैवाने त्यांच्या बंदुकीची कळ खराब झाली. झाडाच्या बुंध्याआड त्यांच्या उघड्या पडलेल्या खांद्यातून गोळी आरपार गेली. दादा रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध पडले.

दादांना सहा वर्षे कोठडी आणि 500 रुपयांचा दंड

वसंतदादांना उपचारासाठी सांगलीच्या सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आलं. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या जीवाचा धोका टळला. दादांच्या विरोधात न्यायमूर्ती दिवेकर यांच्यापुढे खटला चालला. 21 सप्टेंबर 1944 रोजी तुरुंग फोडण्याच्या गुन्ह्याखाली वसंतदादांना सहा वर्षे कोठडी आणि 500 रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. वसंतदादांना येरवड्याच्या तुरुंगात पाठवण्यात आलं. 

घटनेला 79 वर्षे पूर्ण 

वसंतदादांच्या संघर्षमय आणि खडतर जीवनातील हा  एक महत्वाचा टप्पा होता. क्रांतीची मशाल मनात पेटवून ब्रिटिशांविरोधात आंदोलनाचे अग्निकुंड पेटवणाऱ्या सांगलीतील क्रांतिकारकांनी देशात इतिहास घडवला. त्यांनी गाजविलेल्या अनेक शौर्याच्या घटनांनी ब्रिटिश साम्राज्याला हादरवले. यामध्ये वसंतदादांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगलीचा जेल फोडण्याची घटना सर्वाधिक गाजली. एका चित्रपटातील कथेला शोभेल यापद्धतीने जेल फोडण्याचे नियोजन क्रांतिकारकांनी केलं होतं. आज या घटनेला 79 वर्षे पूर्ण होत आहेत. 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here