उद्धव ठाकरेंवर भडकलेल्या राज ठाकरेंनी केली अजित पवारांची स्तुती; नेमकं काय म्हणाले? – mns president raj thackeray praised ncp leader ajit pawar for the development of pimpri chinchwad city
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीची राज्यभर रोजदार चर्चा सुरू आहे. या मुलाखतीत राज यांनी आपले चुलतबंधू आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टोकदार शब्दांमध्ये टीका केली. एकीकडे उद्धव यांच्यावर टीका करत असताना राज ठाकरेंनी विकासकामाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मात्र स्तुती केल्याचं पाहायला मिळालं.
राज ठाकरे यांना सदर मुलाखतीत गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील राजकारणात होत असलेल्या बदलाविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना राज यांनी म्हटलं की, ‘लोकांनी चुकीचं काम करणाऱ्या राजकारण्यांना शासन केल्याशिवाय असे प्रकार थांबणार नाहीत. मात्र जनता शासन करते कोणाला? ज्यांनी विकासकामे केली त्यांनाच निवडणुकीत शासन केलं जातं. नाशिकमध्ये आम्ही विकास केला, मात्र तिथे लोकांनी आम्हाला शासन केलं. राजकीय मतभेद असले तरी अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये काम केलं, हे मान्यच करावं लागेल. मात्र त्यांचीही तेथील सत्ता गेली,’ असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीत नेतृत्वबदल होणार? चर्चांना उधाण आल्यानंतर अखेर रोहित पवार म्हणाले…
दरम्यान, राज ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी घेतलेल्या जाहीर सभांमध्ये अजित पवार यांच्याविरोधात जोरदार हल्लाबोल केला होता. मात्र त्याच अजित पवारांच्या पिंपरी चिंचवडमधील कामाचं आता राज यांनी कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राज ठाकरे यांनी राज्यातील सत्तांतराविषयी बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीबाबत जोरदार टीका केली आहे. ‘तो माणूस बोलतो वेगळे आणि करतो वेगळे. विश्वास ठेवण्यासारखे काही नाही. बाकीच्या लोकांचे मला वाईट वाटते, परंतु हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही.आज पुत्रप्रेमामुळे शिवसेना बुडाली, चांगल्या काळात सत्तेवर यायचे, संपत्ती गोळा करायची आणि मग असला वाईट काळ आला की, बाळासाहेबांच्या नावावर सहानुभूती मिळवायची. एवढेच उद्योग चालू आहेत,’ असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे
‘पाहिलं नाही, ते मुंबईत करून दाखवेन’
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सत्ता मिळाली, तर तुम्ही वेगळे काय कराल, असे राज ठाकरे यांना विचारले असता, जे तुम्ही पाहिले नाही, ते मुंबईत करून दाखवेन. ती गोष्ट काय असेल ते माझ्या जाहीरनाम्यात दिसेल, असे त्यांनी यावेळी नमूद केले.