मुंबई : शिवसेनेतील ऐतिहासिक फुटीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा भाजप नेतृत्वासोबतचा संघर्ष तीव्र झाला आहे. दोन्ही बाजूने एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नसल्याचं चित्र आहे. अशातच भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केलेल्या एका वक्तव्याचा आधार घेत शिवसेनेनं खळबळजनक दावा केला आहे. गडकरींविरोधातही एकेकाळी कुभांड रचण्यात आलं आणि आणि ईडीच्या धाडी टाकण्यात आल्या, असं शिवसेनेनं आपलं मुखपत्र असेलल्या दैनिक ‘सामना’तून म्हटलं आहे.

‘सध्याचं राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण आहे,’ असं म्हणत नितीन गडकरी यांनी राजकीय स्थितीबाबत नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं म्हटलं आहे की, ‘सध्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळात गडकरी हे सगळ्यात अनुभवी व कार्यक्षम मंत्री आहेत. राजकीय सूडबुद्धीने वागणारे ते नेते नाहीत. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे समाजकारण टिकलं तरच राजकारण टिकेल या भूमिकेवर ते ठाम आहेत. अत्यंत लहान वयात ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले, पण दुसऱ्यांदा राष्ट्रीय अध्यक्ष व्हायची वेळ आली तेव्हा त्यांच्याविरुद्ध कुभांड रचून रोखण्यात आले. गडकरी यांच्या अनेक संस्थांवर तेव्हा ‘ईडी’सह तपास यंत्रणांच्या धाडी पडल्या, त्यांना बदनाम केले गेले. गडकरी यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाची दुसरी ‘टर्म’ मिळाली असती तर देशाचा राजकीय इतिहास पूर्णपणे बदललेला दिसला असता,’ अशी भूमिका शिवसेनेनं मांडली आहे.

उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना भावनिक आवाहन; वाढदिवसानिमित्त मागितली खास भेट

‘सध्याच्या राजकीय वातावरणात गडकरी गुदमरत आहेत’

देशातील राजकीय घडामोडींवरून केंद्र सरकारवर शिवसेनेनं अप्रत्यक्षपणे निशाणा साधत सध्याच्या राजकीय वातावरणात गडकरी गुदमरत असल्याचं म्हटलं आहे. ‘सध्याच्या राजकीय वातावरणात गडकरी गुदमरत आहेत. त्यांना जे चाललं आहे ते असह्य होत आहे, पण करायचे काय? या प्रश्नाने सतावले आहे. माणूस किती जगला यापेक्षा तो कसा जगला हे अधिक महत्त्वाचे आहे. काही माणसे आयुष्यभर जीवनमूल्यांकरिता संघर्ष करतात, मात्र ती राजकारणात यशस्वी ठरतातच असे नव्हे. नीतिमत्ता आणि राजकारण या दोन्ही वेगळय़ा गोष्टी असून नीतिमत्तेचा निवडून येण्याशी काहीही संबंध नाही. सध्याच्या राजकारणातील या सत्यावर नितीन गडकरी यांनी नेमकं बोट ठेवलं आहे,’ असं ‘सामना’च्या अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपतिपदाची शपथ घेणार; शपथविधीनंतर २१ तोफांची सलामी देणार

एकीकडे केंद्र सरकारवर टीका करत असताना शिवसेनेनं गडकरी यांच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे. ‘नितीन गडकरी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पक्के अनुयायी आहेत. त्यामुळे त्यांच्या विचारांचा पाया भक्कम आहे. समाजकारणासाठी गटारी राजकारण सोडण्याची प्रेरणा त्यांना नागपुरातूनच मिळत असावी. गडकरी बोलतात म्हणून निदान झाडा-पानांत थोडी तरी सळसळ होते, नाहीतर लोकशाहीचे सर्वच वृक्ष सध्या वठलेले दिसतात. गडकरींचा किल्ला अभेद्य राहावा ही लोकशाहीची गरज आहे,’ अशा शब्दांत शिवसेनेनं गडकरी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.

दरम्यान, शिवसेनेच्या या भूमिकेवर भाजपच्या गोटात काय प्रतिक्रिया उमटते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here