मुंबई: राज्यात सध्या सुरु असलेल्या राजकीय उलथापालथींच्या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या काही वर्षांपासून निवडणुकांमध्ये फारशी चमक दाखवू न शकलेल्या मनसेला आगामी काळात ‘अच्छे दिन’ येतील, असा अंदाज राजकीय जाणकारांकडून वर्तविला जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्विट केले आहे. संदीप देशपांडे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा एक फोटो ट्विट केला आहे. ‘अब राजा का बेटा राजा नही बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा’, अशी कॅप्शन या फोटोसोबत लिहली आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात काही नवी समीकरणं आकाराला येणार का, याविषयी सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.
Aaditya Thackeray: शिवसेनेला आणखी एक धक्का, आता आदित्य ठाकरेही मोदी सरकारच्या रडारवर
संदीप देशपांडे यांनी सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, बाळासाहेबांचे विचार आता राज ठाकरे पुढे घेउन जाणार आहेत. बाकी कोणीही नाही. हिंदुत्व, मराठी माणसाचा, विकासाचा विचार असेल तो राज ठाकरे पुढे घेऊन जात आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर कोणाचाही मालकी हक्क नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तुम्ही आचरणात आणले का ?, असा सवाल संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला विचारला. बाळासाहेबांनी ज्याला विरोध केला, त्यांचासोबत शिवसेनेने व्यवहार केला. उद्धव ठाकरे यांना आता शिवसैनिकांकडे प्रतिज्ञापत्र मागावी लागत आहेत, यापेक्षा मोठं दुर्दैव नाही. शिवसेनेवर ही वेळ आली, याचे सर्व श्रेय उद्धव ठाकरे यांनाच जाते. केमिकल लोचा कोणाचा झालाय, हे स्पष्ट दिसत आहे, असेही संदीप देशपांडे यांनी म्हटले.

शिवसेना फोडण्याचं श्रेय उद्धव ठाकरे यांनाच जातं: राज ठाकरे

बाळासाहेब असते तर आजची परिस्थिती ओढावली नसती. शिवसेना हा पक्ष किंवा संस्था म्हणून पाहू नका. मुळात एका विचाराने बांधली गेलेली माणसं होती. बाळासाहेबांच्या विचारांवर ती माणसं चालत होती. बाळासाहेब होते, तोपर्यंत विचार होते. ते गेले, विचारही गेले. बाळासाहेब असते तर आजची परिस्थिती ओढावली नसती, असे मत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केले होते.

यावेळी राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीचा किस्साही सांगितला होता. “माझ्याकडे देवेंद्र फडणवीस आले होते. त्यावेळी मी त्यांना म्हटलं, की उगीच आजच्या परिस्थितीचं फुकटचं श्रेय घेऊ नका, असं मी त्यांना म्हणताच, ते मोठ्याने हसायला लागले. म्हटलं, जी गोष्ट आज घडलेली आहे, ती गोष्ट ना तुम्ही घडवली, ती गोष्ट ना अमित शहांनी घडवली ना भाजपने घडवली, ना अजून कुणी घडवली, याचं श्रेय म्हटलं उद्धव ठाकरेंनाच द्यावं लागेल…”, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here