गवळी यांनी साखर कामगार, औद्योगिक कामगार, कोतवाल, जिल्हा परिषद कामगार, वन कामगार, काच पत्रा वेचणारे कामगार अशा किती तरी कामगार संघटनांसाठी काम केले. सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून कामगारांचे विविध प्रश्न त्यांनी मार्गी लावले. कामगारांच्या प्रश्नांची ते अभ्यासूर्ण मांडणी करत. मार्क्सवादी तत्वज्ञानाचे ते अभ्यासक होते. यावर त्यांनी विपूल लेखन केले. या विषयावरील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. पुढे त्यांचा लाल निशाण पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्षात विलीन झाला. त्यानंतरही त्यांचे कामगार चळवळीतील कार्य सुरूच होते. तरुण वयापासून चळवळीला वाहून घेतलेला नेता, अशी त्यांची ओळख होते.
नगरमधील टिळक रस्त्यावरील श्रमिक भवन येथील कार्यालयातून ते कामकाज पाहात होते. डाव्या चळवळीतील विचारवंत ते थेट सामान्य कामगार यांच्याशी त्यांचा संपर्क होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा देशात दरारा होता. त्या काळातही त्यांच्याशी थेट संपर्क करू शकणारे नेते म्हणून गवळी यांचा उल्लेख केला जात असे. लाल निशाण पक्षाच्या माध्यमातून त्यांचा काँग्रेस आणि गांधी परिवाराशी संपर्क वाढला होता. गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते. सोमवारी पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच कामगार नेते आणि कामगार संघटनांचे पदाधिकारी तसेच नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले.