साताऱ्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत शिंदे गटातील नेत्यांच्या बैठका सध्या सुरू आहेत. यामुळे नक्की किती शिवसैनिक शिंदे गटात जाणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र असं असलं तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मूळ गाव असलेल्या सातारा जिल्ह्यातून जास्तीत जास्त शिवसैनिक आपल्या गटाला मिळाले पाहिजे, असे प्रयत्न शिंदे गटाचे सुरू आहेत.
पुरुषोत्तम जाधव हे मितभाषी आहेत. तसंच जिल्ह्यातील इतर नेत्यांसोबत जाधव यांच्या असलेल्या संपर्काचा फायदा उचलत त्यांना जिल्हाभर फिरवून संपर्कातले पदाधिकारी कसे जाळ्यात येतील, यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत. तर दुसऱ्या बाजुला जिल्ह्यातील शिवसेनेची ताकद आता तोकडी पडताना पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे ३ जिल्हाप्रमुख काम करत आहेत. तरीही शिवसेनेला मोठं खिंडार पडल्याचं चित्र आहे. जिल्हा शिवसेनेत समन्वयाचा अभाव असल्याचं बोललं जातं. तसंच पक्षाचे संपर्कप्रमुखच संपर्काच्या बाहेर आहेत, अशी अवस्था असल्याची चर्चा आहे.
जिल्ह्यात शिवसेनेकडे आक्रमक आणि लोकांना आपल्याकडे खेचू शकेल, अशा चेहऱ्याचा अभाव जाणवत आहे. सध्या शेखर गोरे हा एकमेव आक्रमक चेहरा सेनेकडे आहे. मात्र असं असताना त्यांच्याकडे पक्षाने अद्याप कोणतीही जबाबदारी दिलेली नाही. त्यामुळे शेखर गोरे सध्या शांत असलेले पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला कोरेगाव मतदारसंघात युवासेनेचे जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले यांच्या मागेही युवकांची चांगली ताकद असल्याचं वेळोवेळी पाहायला मिळालं आहे. त्यामुळे रणजितसिंह भोसले यांची भूमिकासुद्धा महत्त्वाची ठरणार आहे. रणजितसिंह भोसलेंना शिवसेना जिल्ह्यात दुसरी मोठी जबाबदारी देणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.