सख्या भावाने बहिणीवर अत्याचार करण्याची लाजीरवाणी घटना घडली. १५ वर्षीय पीडिता घरी होती. तिचे आई-वडिल बाहेर कामानिमित्त गेले होते. याची संधी साधून नराधम १७ वर्षीय भावाने बहिनीचे शोषण केले. पीडितेची प्रकृती बिघडल्याने तिला घरच्यांनी सेवाग्राम येथील रुग्णालयात नेले असता ती गर्भवती असल्याची धक्कादायक बाब उजेडात आल्याने घरच्यांनी याबाबतची तक्रार शहर पोलिसात दिली. शहर पोलीस ठाण्यातील पोस्को सेलने घटनेचे गांभीर्य ओळखून पीडितेच्या भावाला ताब्यात घेतल्याची माहिती दिली.
पीडिता सहा महिन्याची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब पुढे आल्यावर रुग्णालयातील डॉक्टरांनी थेट पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी पीडितेची विचारपूस केली असता पीडितेने बयाण देण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांपुढे मोठा पेच निर्माण झाला होता. पीडिता माहिती देण्यास टाळाटाळ करीत होती. यामुळे हे प्रकरण सखी वन स्टॉप सेंटरकडे सोपविण्यात आले. सेंटरच्या केंद्र प्रशासक यांनी पीडित मुलीचे समुपदेशन केले. तिला धीर देत विचारपूस केली असता पीडितेने घडलेला सर्व प्रकार पानावलेल्या डोळ्यांनी कथित केला. पीडितेचे बयाण नोंदविल्यानंतर शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.
सख्ख्या बहिनीचे शोषण केल्याच्या धक्कादायक प्रकरणात शहर पोलिसांनी विकृत असलेल्या १७ वर्षीय भावाला ताब्यात घेतले. त्याचेही बयाण नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली आहे.