मुंबई: राज्यातील सत्तापालटानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका करायला सुरुवात केली आहे. शिवसेनेत फूट पडण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हेच सर्वस्वी जबाबदार आहेत. खरी शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरच संपली, उद्धव ठाकरे यांच्या सध्याच्या शिवसेनेचा बाळासाहेबांच्या विचारांशी कोणताही संबंध नाही, असे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटले होते. त्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही ट्विट करून बाळासाहेब ठाकरे यांचे खरे राजकीय वारसदार राज ठाकरे हेच असल्याचे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला होता. मनसेच्या या टीकेला आता शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आहे. (Shivsena leader Manisha Kayande slams MNS chief Raj Thackeray)

शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी मनसेला चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्या सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. बाळासाहेबांच्या पुत्रप्रेमामुळेच शिवसेनेची आज ही अवस्था झाली आहे, असे वक्तव्य करणाऱ्या राज ठाकरे यांना एक सवाल विचारला. राज ठाकरे यांनी स्वतःच्या मुलालाच राजकारणात पुढे का आणले, संदीप देशपांडे यांना का पुढे आणले नाही, असा प्रश्न मनिषा कायंदे यांनी उपस्थित केला. यावर आता मनसेचे नेते काय प्रत्युत्तर देणार, हे पाहावे लागेल.
Uddhav Thackeray: मी अडीच वर्षे मुख्यमंत्री होतो, पण मला सत्तेची चटक लागली नाही: उद्धव ठाकरे
दरम्यान, मनिषा कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीकास्त्र सोडले. एकनाथ शिंदे नक्की मुख्यमंत्री आहेत का? ते नावालाच मुख्यमंत्री आहेत? जर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तर मग भाजपच्या दिल्लीतील बैठकीला फक्त देवेंद्र फडणवीसच कसे असतात?, असा सवालही कायंदे यांनी उपस्थित केला. पत्रकारपरिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचा माईक खेचताना आणि त्यांना चिठ्ठी देताना सर्वांनी पाहिलं आहे. त्यामुळे सरकारचा कारभार कसा आहे, हे वेगळं सांगायला नको, असेही मनिषा कायंदे यांनी म्हटले.

‘उद्धव ठाकरे आता राजकारणात पुन्हा उभं राहतील, असं वाटत नाही’
मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्विट केले आहे. संदीप देशपांडे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा एक फोटो ट्विट केला आहे. ‘अब राजा का बेटा राजा नही बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा’, अशी कॅप्शन या फोटोसोबत लिहली आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात काही नवी समीकरणं आकाराला येणार का, याविषयी सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.

संदीप देशपांडे यांनी सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, बाळासाहेबांचे विचार आता राज ठाकरे पुढे घेउन जाणार आहेत. बाकी कोणीही नाही. हिंदुत्व, मराठी माणसाचा, विकासाचा विचार असेल तो राज ठाकरे पुढे घेऊन जात आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर कोणाचाही मालकी हक्क नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तुम्ही आचरणात आणले का ?, असा सवाल संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला विचारला. बाळासाहेबांनी ज्याला विरोध केला, त्यांचासोबत शिवसेनेने व्यवहार केला. उद्धव ठाकरे यांना आता शिवसैनिकांकडे प्रतिज्ञापत्र मागावी लागत आहेत, यापेक्षा मोठं दुर्दैव नाही. शिवसेनेवर ही वेळ आली, याचे सर्व श्रेय उद्धव ठाकरे यांनाच जाते. केमिकल लोचा कोणाचा झालाय, हे स्पष्ट दिसत आहे, असेही संदीप देशपांडे यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here