राज्यातील काही भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं आणि जनतेचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. हाच मुद्दा पकडत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यादरम्यानच्या काळात हवामान विभागाच्या चुकलेल्या अंदाजाचा पाढा वाचला. जवळपास अर्धा तास घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारला धारेवर धरताना विविध मुद्द्यांवरुन फटकेबाजी केली.
“सध्या हवामान खात्याचे अंदाज हा खूपच मोठा विषय झालाय. मागील दहा दिवसांपूर्वी हवामान खात्याने रेड अलर्ट दिला अन् पावसाचा एक थेंब नाय. आताचंच उदाहरण द्यायचं झालं तर पुणे पिंपरी चिंचवडला पावसाचा इशारा दिला, पण पाऊस मात्र पडला नाही. त्यात जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्ट्या दिल्या. पालकांची चिंता वाढली. परदेशात लंडनला जर आपण गेलो तर संबंधित दिवशी, संबंधित वेळेला पाऊस पडणार असा इशारा हवामान खातं देत असतं. त्याचवेळी लोक छत्र्या घेऊन बाहेर पडतात. म्हणजे किती ती अॅक्युरसी… आणि आपलं हवामान खातं बघा कसं काम करतंय, असे ताशेरे ओढत मला कुणाचं अवमान करायचा नाही. पण असं असेल तर कसं चालणार, अशा शब्दात अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
“सगळ्यांना अपेक्षा असते की अॅक्युरेट हवामानाचा अंदाज मिळाला पाहिजे, पण तसं होताना दिसत नाही. आम्ही हा मुद्दा विधिमंडळात उपस्थित करणार आहोत”, असंही अजित पवार यांनी सांगितलं.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा
अजित पवार यांनी महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिकं आणि बियाणे वाहून गेले आहे. तसेच अतिवृष्टीमुळे राज्यात आतापर्यंत १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या परिस्थितीत सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी अजितदादांनी केली आहे.