Uddhav Thackeray Sanjay Raut : महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत विविध विषयांवर भाष्य केलं. उद्धव ठाकरेंवर गेल्या दिवाळीच्या दरम्यान झालेल्या शस्त्रक्रिया, नेमक्या त्याचवेळी पक्षात सुरु झालेलं फुटीचं वातावरण यावर उद्धव ठाकरेंनी प्रहार केले आहेत.

हायलाइट्स:
- उद्धव ठाकरे स्पष्ट बोलले
- आजारपणातील किस्सा सांगितला
- सामनाच्या मुलाखतीत गौप्यस्फोट
मुलाखतीच्या दुसऱ्या टप्प्यात संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी आजारपणावेळचे अनुभव सांगितले. आजारपणाच्या काळात शस्त्रक्रिया झाली होती त्यावेळी राज्यातील जनता मी बरं व्हावं म्हणून देवाला अभिषेक घालत होते. मात्र, त्याचवेळी काही जण मी तसाच राहावा म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. आता ते पक्ष बुडवायला निघालेत असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या मुलाखतीमधील संवादाचा भाग…
संजय राऊत : तुम्ही इस्पितळात गुंगीत असतानाच तुमचं सरकार पाडण्याचा, पक्ष फोडण्याचा प्रयत्न होत होता?
उद्धव ठाकरे : यावर मी बोलू की नाही?? असा मला प्रश्न पडलाय. कारण माझ्या या अनुभवातून मला कुठलीही सहानुभूती नकोय. तो फार वाईट अनुभव होता.. मानेची शस्त्रक्रिया ही कोणत्याही डॉक्टरांना विचारलं तर त्यात धोके काय असतात हे ते डॉक्टर सांगतील. याची कल्पना मलाही होती. पण ती शस्त्रक्रिया करणं हे मला गरजेचं होतं. त्यातून मी चांगला बाहेरही पडलो पण अचानक पाच-सात दिवसानंतर सकाळी जाग आल्यानंतर खरं तर त्या दिवशी मला डॉक्टरांनी सांगितलं की उद्धवजी आज आपल्याला जिना चढायचा आहे. त्यामुळे मी मानसिक तयारीत होतो. एक एक पाऊल पुढे जायचंय, असा निश्चय मी केला. पण जाग आल्यानंतर मी जेव्हा आळस द्यायचा प्रयत्न केला तेव्हा मानेमध्ये मोठा क्रॅम्प होता. माझी मानेखालची सगळी हालचाल बंद झाली होती. श्वास घेताना मी बघत होतो, माझं पोटं हालत नव्हतं. मी पूर्णपणे निश्चल झालो होतो. एक ब्लडपॉट तिकडे आला होता. सुदैवाने डॉक्टर वगैरे सगळे जागेवर होते, त्यामुळे जो गोल्डन हावर (मौल्यवान वेळ) म्हणतात त्या त्या वेळेत ऑपरेशन झालं म्हणून मी तुमच्यासमोर आज उभा आहे. त्या काळामध्ये पक्षफुटीच्या बातम्या माझ्या कानावर येत होत्या. ज्या काळात माझी हालचाल होत नव्हती.
माझ्या संकटाच्या काळात मी पाहत होतो की, मी बरा व्हावा म्हणून काहीजण प्रार्थना करत होते, तर काहीजण मी असाच अंथरुणाला खिळून राहावा म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. देव पाण्यात बुडवून बसलेली लोक आता पक्ष बुडवायला निघालेत. तेव्हा हे पसरवलं जात होतं की हा काय आता उभा राहत नाही… आपलं काय होणार…? तुझं काय होणार म्हणजे ज्या काळामध्ये माझ्या अनुपस्थितीत आपल्या पक्षाला सावरण्याची वेळ होती. मी कुटुंबप्रमुख, पक्ष प्रमुख शस्त्रक्रिया झाल्यानंतर माझी हालचाल होत नव्हती त्या काळामध्ये ह्यांच्या हालचाली जोरात होत्या. नाही म्हटलं तरी हे वेदनादायी सत्य आयुष्यभर राहणार आहे. की जेव्हा मी तुम्हाला जबाबदारी दिली होती पक्ष सांभाळण्याची, दोन नंबरचं पद दिलं होतं. पक्ष सांभाळायला म्हणून पूर्ण विश्वास दिला होता. तो विश्वासघात तुम्ही केला, मी रुग्णालयात असताना माझी हालचाल बंद होती त्यावेळी तुमची हालचाल जोरात होती आणि ती सुद्धा पक्षाच्या विरोधात होती.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : uddhav thackeay interview by sanjay raut he said at the time of my operation some people create separte group slammed to ekanath shinde
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network