मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी राज्यात घडलेल्या राजकीय उलथापालथीबाबत दैनिक ‘सामना’ला मुलाखत देत आपली भूमिका मांडली आहे. या मुलाखतीतून उद्धव यांनी शिवसेनेतील बंडखोरांचा समाचार घेत असताना भाजपवरही ‘ठाकरी आसूड’ ओढले आहेत. तसंच एकाचवेळी आलेलं आजारपण आणि राजकीय संकटाविषयीचा वेदनादायी अनुभवही उद्धव ठाकरे यांनी सांगितला आहे.

‘तुम्ही इस्पितळात असताना, शस्त्रक्रियेनंतर गुंगीत असताना तुमचं सरकार पाडण्याचा प्रयत्न होत होता. त्याविषयी काय सांगाल,’ असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी आजारपणात झालेला त्रास आणि त्याचवेळी बंडखोरांकडून सरकार पाडण्यासाठी सुरू असलेल्या हालचालींवर भाष्य केलं आहे. ‘मला कुठेही त्या अनुभवातून सहानुभूती नकोच आहे. म्हणून खरं तर मी या विषयावर बोलणं टाळतो, पण तो फार वाईट अनुभव होता. मानेची शस्त्रक्रिया ही काय असते ते कोणत्याही डॉक्टरला विचारा. त्यात काय धोके असतात याची कल्पना मला होती. पण ती शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. माझी पहिली शस्त्रक्रिया झाली. या पहिल्या शस्त्रक्रियेतून मी चांगला होऊन बाहेर पडलो होतो. त्यानंतर पाच-सात दिवसांनी डॉक्टर मला म्हणाले, उद्धवजी, उद्या आपल्याला जिना चढायचा आहे. त्यामुळे मी त्या मानसिक तयारीत होतो की उद्या आपल्याला जिना चढायचाय. एक एक पाऊल पुढे जायचं. सकाळी जाग आल्यानंतर जरा आळस देण्याचा प्रयत्न केला आणि इतक्यात मानेत एक ‘क्रॅम्प’ आला आणि माझी मानेखालची सगळी हालचालच बंद झाली. श्वास घेताना मी पाहिलं तर माझं पोटही हलत नव्हतं. पूर्णपणे मी निश्चल झालो होतो. एक ‘ब्लड क्लॉट’ आला होता. सुदैवाने डॉक्टर वगैरे सगळे जागेवरच होते. ज्याला ‘गोल्डन अवर’ म्हणतात, त्या ‘गोल्डन अवर’मध्ये ऑपरेशन झालं म्हणून मी तुमच्यासमोर आज इथे बसलो आहे. त्यावेळी माझे हातपाय हलत नव्हते, बोटं हलत नव्हती, सगळ्यात मोठं टेन्शन होतं की डास चावला, मुंगी चावली तर खाजवायचं कसं? हाही एक वेगळा विचित्र भाग होता,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.

राजकारणात ज्या आईने जन्म दिला, त्याच आईला गिळायला निघालेली ही अवलाद, ठाकरेंकडून शिंदेंचे वाभाडे

‘मी आजारी राहावा म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते’

शिवसेनेत झालेल्या ऐतिहासिक बंडखोरीबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे गंभीर आरोप केला आहे. ‘मी आजारी असताना माझ्या कानावर येत होतं की, काहीजण मी बरा व्हावा म्हणून देवावर अभिषेक करत होते आणि काहीजण मी असाच राहावा म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. ते देव पाण्यात बुडवून बसलेले लोक आता पक्ष बुडवायला निघाले आहेत आणि तेव्हा पसरवलं जात होतं की, हे आता काही उभे राहात नाहीत. आता आपले काय होणार?… तुझं काय होणार? ही चिंता त्यांना होती. ज्या काळात आपल्याला पक्षाला सावरण्याची वेळ होती. मी पक्षप्रमुख, कुटुंबप्रमुख आहे, पण शस्त्रक्रिया झाल्यानंतर माझी हालचाल होत नव्हती, त्या काळात यांच्या हालचाली जोरात सुरू होत्या. हे वेदनादायी सत्य आयुष्यभर माझ्यासोबत राहणार आहे,’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आपलं दु:ख बोलून दाखवलं आहे.

दरम्यान, जेव्हा मी तुम्हाला पक्ष सांभाळण्याची जबाबदारी दिली होती, नंबर दोनचं पद दिलं होतं. पक्ष सांभाळण्यासाठी पूर्ण विश्वास टाकला होता, त्या विश्वासाचा घात तुम्ही केलात. मी हॉस्पिटलमध्ये असताना माझी हालचाल बंद होती. तेव्हा तुमच्या हालचाली जोरात होत्या आणि त्याही पक्षाच्या विरोधात, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here