ज्या ठाण्यानं शिवसेनेला पहिली ताकद दिली, बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्याचं एक भावनिक नातं होतं. पहिला भगवा झेंडा ठाण्यात फडकला. बाळासाहेब त्यांच्या आयुष्यात ‘ठाण्यानं सत्ता दिली’ असं अभिमानानं सांगत राहिले. त्याच ठाण्यातून शिवसेनेला आव्हान उभं राहिलं. आता शिवसेनेचे नेतृत्व म्हणून आपला प्लॅन काय?, असा थेट सवाल ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला. त्यावर उद्धव यांनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख ‘पालापाचोळा’ असा करत ज्या आईने मोठं केलं, त्याच आईला गिळणारी ही अवलाद आहे, अशा ठाकरी भाषेत शिंदेंवर शरसंधान साधलं. ‘सामना’ला दिलेल्या स्फोटक मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर जोरदार आसूड ओढले.
निवडणुका होऊ द्यात, जनता बंडखोरांना गाडल्याशिवाय राहणार नाही
बाळासाहेब त्यांच्या आयुष्यात ‘ठाण्यानं सत्ता दिली’ असं अभिमानानं सांगत राहिले. त्याच ठाण्यातून शिवसेनेला आव्हान उभं राहिलं, असं संजय राऊत म्हणताच उद्धव म्हणाले, ठाणेकर जनता सुज्ञ आहेत. हा जो पालापाचोळा आहे, ते ठाणेकर नाहीत. ठाणेकर आणि ठाणेकर नागरिक, ठाण्याची शिवसेना आणि शिवसेनेचं ठाणं हे नातं पालापाचोळ्याला तोडता येणार नाही. ठाणे, मुंबई आणि महाराष्ट्राची जनता निवडणुकीची वाट पाहत आहे. ज्यावेळी निवडणूक होईल, तेव्हा जनता यांना गाडल्याशिवाय राहणार नाही.
आईला गिळायला निघालेली ही अवलाद
“मी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं असतं, तर त्यांनी आणखी काय वेगळं केलं असतं? कारण यांची भूक भागत नाहीये. यांना मुख्यमंत्रिपद पण हवंय आणि आता यांना शिवसेनाप्रमुख व्हायचंय. शिवसेनाप्रमुखांबरोबर स्वतःची तुलना करायला लागलेत हे आता… राजकारणात ज्या आईने जन्म दिला, त्याच आईला गिळायला निघालेली ही अवलाद आहे”, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांचे ठाकरी भाषेत वाभाडे काढले.