‘जनताच यांना पुरून टाकेल राजकारणातून’
ठाकरेंना शिवसेना खरी की खोटी याचे पुरावे द्यावे लागत आहेत. त्यामुळे पुरावे देण्याची स्थिती निर्माण करणाऱ्या लोकांना जनताच पुरून टाकेल. लोकं आता निवडणुकांची वाट पाहात आहेत, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
‘माझ्या दुर्दैवाने माझे आई-वडील माझ्यासोबत असे नाहीयेत, पण…’
एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या बंडखोर आमदार-खासदारांनी पक्षनेतृत्वाविरोधात बंड केलं असलं तरी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतलेला नाही. शिवसेनेवरच दावा सांगण्याचा या गटाचा प्रयत्न आहे. शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या प्रयत्नावर संताप व्यक्त करत उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, ‘माझं त्यांना आव्हान आहे, ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडून दाखवा. मात्र ते करताना माझ्या वडिलांचे फोटो लावून मतं मागू नका. प्रत्येकाला आई-वडील असतात. मला माझ्या आई-वडिलांबद्दल आदर आहे. तसा प्रत्येकाला प्रत्येकाच्या आई-वडिलांबद्दल आदर असला पाहिजे. गेल्याच आठवडय़ात गुरुपौर्णिमा झाली. मी माझ्या वडिलांना आणि आजोबांना गुरू मानतो. प्रत्येकाने मातृदेवभव, पितृदेवभव असं देव मानले पाहिजेत. स्वतःच्या आई-वडिलांचे फोटो लावावेत आणि मतं मागावीत. आज माझ्या दुर्दैवाने माझे आई-वडील माझ्यासोबत असे नाहीयेत, पण ते माझ्यात आहेत असे मी मानतो. पण ज्यांचे आईवडील सुदैवाने त्यांच्यासोबत आहेत त्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या आशीर्वादाने काम करावे. मी तर म्हणेन असा आशीर्वाद दुसरा मिळू शकत नाही. त्यांना घेऊन सभा घ्याव्यात, भाषणं करावीत आणि मतं घ्यावीत. माझे वडील का चोरताय?’ असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना विचारला आहे.