मुंबई: मी शस्त्रक्रियेच्या गुंगीत असताना सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू होता. ज्यांच्यावर विश्वास टाकला, दुसऱ्या क्रमांकाचं पद दिलं, तेच आता शिवसेना गिळायला निघाले आहेत, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं. शिवसेना आमचीच याचे पुरावे देण्याची आम्हाला गरज नाही. मतदारच निवडणुकीतून याचं उत्तर देतील. लोक निवडणुकांची वाट पाहत आहेत, असं ठाकरे म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे हृयात असताना नारायण राणे, छगन भुजबळ यांच्यासारखे मोठे नेते शिवसेना सोडून गेले. त्यांच्यासोबत काही आमदारही गेले. मात्र शिवसेनेत उभी फूट कधीच पडली नव्हती. मग यावेळीच असं का घडलं, असा प्रश्न सामनाचे संपादक संजय राऊत यांनी ठाकरेंना विचारला. त्यावर मी ज्यांना अधिकार दिले होते, त्यांनीच माझा विश्वासघात केला, असं उत्तर ठाकरेंनी दिलं.
शिवसेनेबाबत विश्वासघाताचं राजकारण वारंवार का? उद्धव ठाकरेंनीच सांगितलं काय चुकतंय
मी मुख्यमंत्री झाल्यावर लोक माझ्या तोंडावर बोलत नव्हते. पण मला कुजबूज ऐकू यायची की, काय हे मुख्यमंत्री आहेत.. नगरविकास खातं मुख्यमंत्र्यांकडे असायला हवं. मलईदार खातं आहे म्हणतात. पण मी ते खातं माझ्याकडे न ठेवता विश्वासानं त्यांच्याकडे सोपवलं होतं. मी मलई बिलई खाण्यासाठी गेलो नव्हतो. मी माझ्याकडे जी खाती ठेवली होती ती एक म्हणजे सामान्य प्रशासन, दुसरे न्याय व विधी. आयटीही ठेवलं होतं. कारण खरंच या तंत्रज्ञानाचा उपयोग सगळ्या खात्यांसाठी काहीतरी करता येईल का, हा माझा विचार होता, असं ठाकरेंनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here