तमिळनाडूच्या तिरुपूरमध्ये एका विधवा आईनं १० वर्षांच्या मुलीची हत्या केली. मुलीला गळफास लावत आईनं तिला संपवलं. यानंतर आईनं स्वत:ही पंख्याला गळफास लावून घेत आत्महत्या केली. महिलेनं काही दिवसांपूर्वीच सरकारी नोकरीसाठी परीक्षा दिली होती. मात्र तिला परीक्षा कठीण गेली होती.

पुंगोडी खासगी कंपनीत नोकरी करायच्या. मात्र दोन महिन्यांपूर्वी त्यांनी नोकरी सोडली. त्यांना सरकारी नोकरी करायची होती. त्यांनी त्यासाठी परीक्षा दिली. याच परिक्षेच्या तयारीसाठी पुंगोडी यांनी नोकरी सोडली होती. २४ जुलैला त्यांनी TNPSCचे पेपर दिले. दिवसरात्र अभ्यास करूनही पुंगोडी यांना पेपर चांगले गेले नाहीत. त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला.
पुंगोडी दिवसरात्र तणावाखाली होत्या. याबद्दल त्या शेजाऱ्यांशीदेखील बोलल्या. हातातील नोकरी गेलेली आणि पैसेही संपत आलेले अशा कात्रीत त्या सापडल्या होत्या. पुंगोडी यांनी साखरझोपेत असलेल्या आपल्या मुलीला उठवलं. त्यांनी गळफास आधीच तयार ठेवला होता. त्यांनी मुलीला गळफास लावला. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. यानंतर पुंगोडी यांनी पंख्याला गळफास लावत स्वत:ला संपवलं.
घटना घडली त्यावेळी पुंगोडी यांची आई सरस्वती घरी नव्हत्या. घरी येताच त्यांना मुलगी आणि नातीचे मृतदेह दिसले. ते पाहून त्यांना मानसिक धक्का बसला. सरस्वती यांनी तातडीनं पोलिसांना फोन केला. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन ते शववविच्छेदनासाठी पाठवले. मात्र अहवाल अद्याप आलेला नाही.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network