पोलिसांनी निशांकच्या कुटुंबाला घटनेची माहिती दिली आणि त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. निशांकच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी पोलीस शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत. रविवारी रात्री आपल्या व्हॉट्स ऍपवर निशांकच्या इन्स्टाग्राम आयडीचा एक स्क्रीनशॉट आल्याचं त्याच्या मित्रांनी आणि कुटुंबातील सदस्यांनी सांगितलं. स्क्रीनशॉटवर फोटो होता आणि त्यावर ‘गुस्ताख-ए-नबी की एक ही सजा, सिर तन से जुदा’ असा मजकूर होता.
निशांक राठोर रविवारी दुपारी ३ वाजल्यापासून बेपत्ता होता. त्यामुळे त्याचं कुटुंब चिंतेत होतं. निशांकची इन्स्टाग्राम आणि फेसबुक स्टोरी पाहिल्यानं त्यांची चिंता अधिकच वाढली. कारण स्टोरी, पोस्टमधील निशांकच्या फोटोवर ‘गुस्ताख-ए-नबी की एक ही सजा, सिर तन से जुदा’ असं लिहिलं होतं. त्यामुळे निशांकचं कुटुंब त्याचा शोध घेत होतं. त्याच्या फोनवर रिंग जात होती. मात्र तो कट करण्यात येत होता.
संध्याकाळी ६ च्या सुमारास निशांकचे वडील उमा शंकर राठोर यांना व्हॉट्स ऍपवर एक मेसेज आला. राठोर साहेब, तुमचा मुलगा खूप शूर होता, असं त्यात लिहिलं होतं. त्यापुढे ‘गुस्ताख-ए-नबी की एक ही सजा, सिर तन से जुदा’ असंही लिहिण्यात आलं होतं. यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास बरखेडा रेल्वे रुळांवर पोलिसांना एका तरुणाचा मृतदेह सापडला. तो निशांकचा असल्याचं तपासातून समोर आलं. त्यानंतर याची माहिती त्याच्या कुटुंबाला देण्यात आली.