भाजपसोबत गेलेल्या आमदारांवर प्रश्नांची सरबत्ती
शिवसेनेतील आमदारांना घेऊन बंड करण्याआधी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना भेटून भाजपसोबत जाण्याची विनंती केली होती. याबाबत माहिती देताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांना अनेक प्रश्न विचारले आहेत. ‘मला असं सांगण्यात आलं, काही आमदारांचा दबाव आहे की, आपल्याला भाजपसोबत जायचंय. मी म्हटलं, अशा सगळय़ा आमदारांना आणा माझ्यासोबत. दोन-तीन प्रश्न माझ्या मनात आहेत. एक म्हणजे कारण नसताना शिवसैनिकांना ईडीपिडी लावली. छळ चाललाय. ते हिंदुत्वासाठी त्या वेळेला दंगलीत लढलेले शिवसैनिक ज्यामध्ये अनिल परब असतील किंवा हिंदुत्वाची बाजू लावून धरलेले तुम्ही असाल, यांना तुम्ही एकदम छळायला लागलात. हा छळ कुठपर्यंत चालणार. कारण नसताना… असा यांचा काय मोठा गुन्हा आहे? दुसरी गोष्ट, त्यावेळी जे ठरवून नाकारले त्याचे यावेळी भारतीय जनता पक्ष आता काय करणार? शिवसेनेला सन्मानाची वागणूक कशी देणार? तिसरी गोष्ट मला आमदारांना विचारायचीय, खासदारांना मी त्या दिवशी ‘मातोश्री’वरच्या बैठकीत विचारलीय की, गेली अडीच वर्षे कोणी हिंमत केली नाही असं बाळासाहेबांच्या कुटुंबीयांवर ‘मातोश्री’वर अश्लाघ्य भाषेत बोललं गेलंय, त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार आहात? मधल्या काळात तुम्ही का बोलला नाहीत, की आम्हाला हे मान्य नाही. एवढं सगळं तुमच्या नेत्यांच्या कुटुंबीयांबद्दल, घराबद्दल, नेत्याबद्दल, ‘मातोश्री’बद्दल बोलूनही तुम्ही शेपट्या घालून जाणार?’ असे खरमरीत प्रश्न उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना विचारले आहेत.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा काल पहिला भाग प्रदर्शित झाल्यानंतर बंडखोर गटाकडून आमदार संजय शिरसाट यांनी उत्तर दिलं होतं. आजही उद्धव ठाकरे यांच्याकडून टीकेचे बाण सोडण्यात आल्यानंतर ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्यासाठी कोणता नेता समोर येतो, हे पाहावं लागेल.