संजय राऊत यांनी ‘सामना’साठी उद्धव ठाकरे यांची नुकतीच मुलाखत घेतली होती. दोन टप्प्यांत झालेल्या या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग आज प्रसिद्ध झाला. ही मुलाखत सुरु असताना ईडी, आयकर आणि सीबीआय यांच्यासारख्या केंद्रीय यंत्रणांकडून सुरु असलेल्या कारवाईचा मुद्दा निघाला. त्यावेळी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना एक प्रश्न विचारला. कालपर्यंत शिवसेनेच्या ज्या लोकांना तुरुंगात पाठवण्याची आणि फासावर चढवण्याची भाषा भाजपचे नेते करत होते, आज तेच लोक भाजपसोबत गेले आहेत. याबद्दल तुम्हाला काय वाटते, असे संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना विचारले.
त्यावर शिवसेना पक्षप्रमुखांनी म्हटले की, शिवसेनेची साथ सोडून भाजपसोबत गेलेले लोक आता पवित्रा झाले असतील. तुमच्यावरही आरोप सुरु आहेत. तुम्हालासुद्धा अटक करणार, असे वातावरण तयार केले जात आहे. फक्त तपासयंत्रणांचा गैरवापर केला जात आहे, दुसरे काय?, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
उद्धव यांच्या या वक्तव्याला संजय राऊत यांनी दुजोरा दिला. त्यावर उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, याला काय म्हणायचं? पण तुम्ही हटत नाही. तुम्ही तिकडे गेलात तर पुण्यवान व्हाल. त्यावर संजय राऊत यांनी म्हटले की, होय मला तसं सांगण्यातच आलं होतं, पण मला अशाप्रकारे पुण्यवान व्हायचं नाही. सगळ्या पुण्यात्म्यांना भाजपसोबत जाऊ दे. आपण धर्मात्मे आहोत. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की, कर्माने मरणाऱ्याला धर्माने मारू नका. शेवटी प्रत्येकाच्या पापाचा घडा भरतच असतो, असे राऊत यांनी म्हटले.
भाजपमध्ये गेल्यावर लोक पवित्र होतात: उद्धव ठाकरे
तसेच भाजपमध्ये गेल्यानंतर नेते पवित्र कसे होतात, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. एखाद्यावर आरोप करायचे नंतर त्याला ‘कुंभमेळ्याला’ न्यायचं, असा प्रकार भाजपकडून सुरु आहे. कारण तुमच्या लक्षात असेल की, नितीन गडकरी बोलले होतेच की, आमच्याकडे ‘वॉशिंग मशीन’ आहे. लोकांना घेऊन आम्ही पुण्यवान करतो. त्यांच्याकडे जे लोक आरोपांमुळे गेलेत, त्यांचे पुढे काय झाले ते पण पाहावे लागेल. भाजपमध्ये गेलेले लोक पवित्र झालेत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.