मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार आणि खासदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठं भगदाड पडलं आहे. शिंदे गटाकडून आता थेट शिवसेना पक्षावरच दावा सांगितला जात असून लोकप्रतिनिधींनंतर संघटनेतील पदाधिकारीही आपल्या गटात खेचण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे ठाकरे कुटुंबाच्या राजकीय अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेला पुन्हा नवी उभारी देण्यासाठी आणि बंडखोरांचा डाव मोडीत काढण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रणनीती आखली असून याबाबत दैनिक ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.

‘राज्यातले वातावरण आज ढवळून निघत आहे. आज आदित्यचे दौरे आपण बघत आहात. या दौऱ्यांमध्ये प्रचंड गर्दी उसळते आहे. सगळीकडे हीच चर्चा आहे की विश्वासघातक्यांना धडा शिकवायचा,’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिवसेनेतील बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. तसंच आपण लवकरच राज्यव्यापी दौरा करणार असल्याची घोषणाही केली.

उद्धव ठाकरे संजय राऊतांना म्हणाले, ‘ ईडी तुम्हालाही अटक करु शकते, भाजपसोबत गेलात तर…’

कसा असेल उद्धव ठाकरे ठाकरेंचा महाराष्ट्रव्यापी दौरा?

शिंदे गटाच्या दाव्यामुळे शिवसेना कुणाची, हा प्रश्न निर्माण झाल्याने उद्धव ठाकरे हे सावध पावलं उचलत आहेत. त्यांनी लगेच दौऱ्याला सुरुवात करण्यापेक्षा पक्षातील सदस्य नोंदणीवर भर दिला आहे. मात्र ही सदस्य नोंदणी पूर्ण होताच मी साधारणतः ऑगस्टमध्ये बाहेर पडणार आहे, असं ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

तुम्ही स्वतः सुरतला गेला असता तर…; राऊतांनी प्रश्न विचारताच उद्धव ठाकरेंकडून बंडखोरांवर प्रश्नांची सरबत्ती

‘गेल्याच आठवड्यात जिल्हाप्रमुखांना काही सूचना दिल्यात, जास्तीत जास्त सदस्य नोंदणी, त्याच्यानंतर सक्रिय कार्यकर्त्यांची नोंदणी. हे मोठ्या प्रमाणात आता सुरू आहे. आता आदित्य फिरतोय. एका एका टप्प्याने जातोय. ठीक आहे. त्याच्यानंतर मी राज्यात फिरायला लागेन तेव्हा त्यात या लोकांना येण्यासाठी ही कामं सोडावी लागतील म्हणून मी तेवढय़ासाठी थांबलोय. एकदा ही नोंदणीची कामं होऊ द्या. मग मी बाहेर पडेन. सगळे नेते माझ्यासोबत फिरतील. अख्ख्या राज्याचा दौरा होईल. राज्यात वादळ निर्माण करू,’ असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, शिवसेनेचं तुफान आहेच. लोकांच्या मनात, हृदयात आजही तुफान आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचं तुफान पुन्हा येईल, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here