आनंद दिघे आणि दि. बा. पाटलांच्या फोटोमुळे जोरदार चर्चा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण हे मुद्दे घेऊन बंड केल्याचे सांगितले. मात्र माजी आमदार सुभाष भोईर यांनीही दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्यासोबत काम केलं असून त्यांचा पगडा भोईर यांच्या कार्यशैलीत दिसत असल्याचं बोललं जातं. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय, ग्रामीण भागातील भूमिपुत्रांचा पाठिंबा, नवी मुंबई विमानतळ नामकरण समितीमधील त्यांचा सहभाग या साऱ्या माजी आमदार सुभाष भोईर यांच्या जमेच्या बाजू आहेत.
कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखपदी भोईर यांची नियुक्ती
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाणे जिल्ह्याची धुरा ही सुभाष भोईर यांच्या खांद्यावर जाण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र ठाकरे यांच्या आदेशानुसार कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखपदी भोईर यांची नियुक्ती करण्यात आली. एकनाथ शिंदे आणि सुभाष भोईर यांचे फारसे पटत नसल्याने भोईर गेल्या काही वर्षांपासून शांततेच्या भूमिकेत होते. ते पक्ष सोडतील अशी देखील चर्चा होती. मात्र राजकीय वारे बदलताच भोईर जिल्ह्यात सक्रिय झाल्याचे दिसत आहे.
२०१९ मध्ये काय घडले?
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सुभाष भोईर यांचे नाव उमेदवारीसाठी पक्षाच्या यादीत अग्रक्रमावर असताना, खुद्द उद्धव ठाकरे यांनी भोईर यांना एबी फॉर्म दिला. भोईर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जिल्ह्यातील नेत्यांच्या नाराजीमुळे त्यांना आपला अर्ज मागे घ्यावा लागला होता. दरम्यान डोंबिवलीतील शिवसेनेचे नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांना कल्याण ग्रामीण मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली. या सगळ्या प्रकारामुळे ग्रामीण मतदारसंघातील शिवसेनेत चलबिचल झाली. स्थानिक उमेदवारालाच उमेदवारी द्या, बाहेरील उमेदवार येथे नको, अशी ओरड स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली आणि निवडणूक निकालातही याचे प्रतिबिंब दिसले. या मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव होऊन मनसेचे राजू पाटील हे विजयी झाले.