खासदार राहुल शेवाळे यांनी बुधवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत यासंदर्भात भाष्य केले. मी सर्वप्रमथ उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आम्ही दरवर्षी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस उत्साह आणि आनंदाने साजरा करत असतो. आमच्यापैकी अनेकजण सामना वृत्तपत्रात उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी शुभेच्छा देणाऱ्या जाहिराती देतात. दरवर्षीप्रमाणे आम्ही यंदाही जाहिराती देण्यासाठी ‘सामना’शी संपर्क साधला. मात्र, या जाहिराती स्वीकारण्यात आल्या नाहीत. ‘सामना’तील कर्मचाऱ्यांना यासंदर्भात आदेश देण्यात आले होते, असे राहुल शेवाळे यांनी म्हटले. मात्र, ‘सामना’कडून यासंदर्भात कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही.
दरम्यान, खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या ‘सामना’तील मुलाखतीवर भाष्य करणे टाळले. आज उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे. आज आनंदाचा दिवस आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोणतीही टीका करणार नाही, असे राहुल शेवाळे यांनी म्हटले.
पुनश्च ‘उठा’! ठाण्यातील बॅनर्सची चर्चा
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखपदी सुभाष भोईर यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी कल्याण लोकसभा मतदार संघ पिजून काढला. तसंच आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या फुटीमुळे अस्वस्थ झालेल्या शिवसैनिकांनाही भोईर यांनी आधार दिला. ठाणे जिल्ह्यात आता शिवसेनेचे नेते म्हणून सुभाष भोईर यांच्याकडे पाहू लागले आहेत. भोईर यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचं टायमिंग साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे.
या बॅनरवरील मजकूर चर्चेचा विषय ठरत आहे. बॅनरवर उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या असून ‘पुनश्च उठा…आपण बाळासाहेबांची सावली, हिंदुहृदयसम्राटांचं रक्त, सर्वसामन्यांच्या प्रेमाचे आसक्त, तरीही योग्यासमान विरक्त…धीरगंभीर अन् कणखर, न होई विचलित क्षणभर…इतकी पातळ नाही शिवसेना, तमाम हिंदू मने मनापासून आपल्याच पाठीशी आहेना,’ असा मजकूर या बॅनर्सवर लिहला आहे.