पोर्ट ऑफ स्पेन : वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेला भारतीय संघ सध्या दमदार कामगिरी करत आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये विजयी पताका फडकल्यानंतर तिसऱ्या सामन्यात कॅरेबियन संघाला धूळ चारण्यासाठी भारतीय खेळाडू सज्ज आहेत. शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या टी-ट्वेण्टी मालिकेसाठीही कर्णधार रोहित शर्मासह इतर काही खेळाडू पोर्ट ऑफ स्पेनमध्ये दाखल झाले आहेत. अशातच मंगळवारी सायंकाळी भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याने इंस्टाग्राम लाईव्हद्वारे सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा आणि युजवेंद्र चहल या संघातील सहकाऱ्यांसोबत गप्पा मारल्या. या खेळाडूंमध्ये मजेशीर गप्पा सुरू असतानाच लाईव्ह व्हिडिओत काही क्षणांसाठी भारताचा माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी याची एण्ट्री झाल्याने माहीच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला.

आक्रमक फलंदाजी आणि कर्णधार म्हणून केलेल्या अनेक विश्वविक्रमांमुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये तुफान लोकप्रिय असलेला महेंद्रसिंह धोनी हा सोशल मीडियापासून दूर राहणंच पसंत करतो. त्यामुळे त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी प्रतीक्षा करावी लागते. मंगळवारी ऋषभ पंत हा इंस्टाग्रामवरून सूर्यकुमार आणि रोहितसोबत गप्पा मारत असतानाच महेंद्रसिंह धोनी याची पत्नी साक्षी हीदेखील त्यांना जॉइन झाली. त्यावेळी माही भाईकडे कॅमेरा फिरव, अशी विनंती पंतने केली. मात्र पंत आणि रोहितला फक्त हाय-हॅलो करत धोनीने लगेच पत्नी साक्षीकडून फोन घेतला आणि कॅमेरा बंद केला.

बीसीसीआयचा मोठा निर्णय, ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी खास व्यक्तीची भारतीय संघात निवड

धोनीने आपल्या केसांना रंग लावल्याने त्याने लाईव्ह व्हिडिओमध्ये फार काळ थांबणं पसंत केलं नाही. हीच बाब ऋषभ पंत आणि रोहित शर्माच्याही लक्षात आली आणि दोघेही जोरजोरात हसू लागले. या व्हिडिओत धोनी अवघ्या चार सेकंदांसाठी दिसला असली तरी सोशल मीडियावर व्हिडिओची जोरदार चर्चा होत आहे.

भारत आज खेळणार तिसरा वनडे सामना

भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यानच्या वनडे मालिकेतील तिसरा सामना आज रंगणार आहे. भारताने या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली असल्याने तिसरा सामनाही जिंकून विंडीजविरुद्ध निर्भेळ यश मिळवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here