सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील देवगड येथील महिलेचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात करोनाबाधितांची एकूण संख्या पाच झाली आहे. नवी मुंबईतील वाशी येथून संबंधित महिला गावी आली आहे. देवगड तालुक्यातील पडेल प्राथमिक केंद्रातून या महिलेला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून तिथे उपचार सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, संबंधित महिलेच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

सिंधुदुर्गात आज मितीस एकूण ९४६ व्यक्ती अलगीकरणात असून ६३२ व्यक्ती गृह अलगीकरणात तर ३१४ व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण ८०२ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी ७६५ तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील ५ अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरीत ७६० अहवाल निगेटीव्ह आले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात करोना सदृष्य लक्षणे असलेले २६ रुग्ण दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत २५९१ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात आढळलेल्या ५ करोनाबाधित रुग्णांपैकी ३ रुग्णांवर विलगीकरण कक्षामध्ये उपचार सुरू आहेत. तर इतर दोन रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत.

सिंधुदुर्गात येण्यासाठी १८ हजार जणांची नोंदणी

आतापर्यंत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांत जाण्यासाठी १३ हजार २५ व्यक्तींनी जिल्हा प्रशासनाच्या लिंकवर नोंद केली आहे. या सर्वांना त्यांच्या संबंधित जिल्ह्यामध्ये प्रवेश देण्याबाबत त्या त्या जिल्हा प्रशासनास कळविण्यात आले आहे. तसेच राज्याबाहेर जाण्यासाठी १७ हजार १३० व्यक्तींनी लिंकवर नोंदणी केली आहे. नोंद केलेल्यांची यादी संबंधित राज्यातील नोडल अधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहे. तसेच परराज्यात जाणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या संबंधित राज्याच्या लिकंवर जाऊन नोंदणी करून पास प्राप्त करून घेण्याविषयी संबंधित राज्य शासनांनी कळविले आहे. त्याबाबतच्या लिंकची माहिती संबंधित राज्यांनी जिल्हा प्रशासनास कळविली आहे. सिंधुदुर्गात येण्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून १८ हजार ८६४ व्यक्तींनी नोंदणी केली आहे. त्यापैकी रेड झोनमधील हॉटस्पॉट व कंटेनमेंट झोनमधील व्यक्ती वगळून इतर क्षेत्रातील व्यक्तींना परवानगी देण्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनास कळविले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ११ कॅम्पमध्ये एकूण २१५ कामगार व बेघर व्यक्ती वास्तव्यास आहेत. या सर्वांच्या निवासासोबतच भोजनाची व्यवस्था जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. गावी आलेल्या चाकरमान्यांना गावातील शाळेत क्वारंटाइन करून ठेवावे अशी योजना आहे, पण शाळांमध्ये तेवढ्या सुविधा नाहीत. जिल्हाधिकारी ते सरपंच, पोलिस पाटील, शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक यांची समिती जीव तोडून काम करते आहे. मात्र एकूणच परिस्थिती हाताबाहेर जाते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

गोवा सीमेवर वाहनांच्या रांगा

गोवा सीमेपासून काही किलोमीट अंतरावर असलेल्या बांदा तपासणी नाका येथे तपासणीसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. त्याअनुशंगाने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी बांदा तपासणी नाका येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी गोव्याचे प्रधान सचिव पुनित गोयल, उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी आर. मेनका, सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी बांदा तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी जलदगतीने होण्याविषयी चर्चा करण्यात आली. तसेच तपासणी जलदगतीने होण्यासाठी आणखी तपासणी काऊंटर उभारण्याच्या सूचना करण्यात आल्या.

आणखी वाचा:

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here