संबंधित मुलीच्या तक्रारीनंतर मंगळवारपासून कारवाईची चक्रे हालायला सुरुवात झाली होती. ही घटना समोर आल्यानंतर गदारोळ निर्माण झाला होता. त्यानंतर प्रकल्प अधिकारी बुधवारी भल्या पहाटे या शाळेत पोहोचले. अधिकारी शाळेत दाखल होताच शिक्षकांची एकच पळापळ सुरु झाली. नियमानुसार आश्रमशाळेतील शिक्षकांनी मुख्यालयात राहणे बंधनकारक असते. मात्र, अनेक शिक्षक आपापल्या घरून येऊन-जाऊन आश्रमशाळेत शिकवत असल्याचा प्रकार यावेळी समोर आला. प्रकल्प अधिकारी शाळेत पोहोचले तेव्हा अनेक शिक्षक घरी होते. अधिकारी आल्याचे समजताच हे शिक्षक तातडीने शाळेकडे जाण्यासाठी निघाले. त्यावेळी देवगाव घोटी रस्त्यावर शिक्षकांच्या कारला अपघात झाला. या अपघातामध्ये कार पलटी झाली. यामध्ये आश्रमशाळेतील तीन शिक्षिका जखमी झाल्या आहेत.
नेमका प्रकार काय?
देवगाव येथील शासकीय आश्रमशाळेने गेल्या आठवड्यात वृक्षारोपण अभियान राबवले. देवगाव आश्रमशाळेतील १२ वी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला एका शिक्षकाने ‘तुला मासिक पाळी असल्याने, तू वृक्षारोपण करू नको’ असे म्हणत इतर मुलींसमोर अपमानित केले. तसेच, वृक्षारोपणापासूनही रोखले. संबंधित विद्यार्थिनीने मंगळवारी नाशिक येथे आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्तांची भेट घेत घडला प्रकार कथन केला. या मुलीच्या तक्रारीची राज्य महिला आयोगानेही दखल घेतली असून, संबंधित शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी केली होती.
त्यावेळी शाळेच्या एका शिक्षकाने, ‘ज्या मुलींना मासिक पाळी असेल, त्यांनी वृक्षारोपण करू नका. त्यांनी लावलेले झाड जगणार नाही, असा फतवाच काढला होता. विशेष म्हणजे आपले हे अजब तत्त्वज्ञान त्यांनी १२ वी विज्ञानशाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीस ऐकवले आणि तिला झाडाचे रोप लावण्यास मनाई केली होती. याबाबत मानसिक ठेच पोहोचलेल्या या विद्यार्थिनीने रविवारी श्रमजीवी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान मधे यांची भेट घेतली आणि घडलेला प्रकार कथन केला. मधे यांनी तातडीने आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त यांना दूरध्वनीवरून घडलेला प्रकार सांगितला. मात्र, त्यानंतरही शासन यंत्रणा हालली नाही. अखेर मंगळवारी संबंधित मुलीने मंगळवारी थेट अप्पर आयुक्त यांची भेट घेत घडलेला प्रकार कथन केला. त्यानंतर सरकारी स्तरावरून कारवाईची सूत्रे हालायला सुरुवात झाली.