बिंदुमाधव, जयदेव आणि उद्धव ही बाळासाहेबांची तीन मुलं.. बिंदुमाधव यांचं २००६ ला कार अपघातात निधन झालं.. यानंतर जयदेव आणि बाळासाहेब यांच्यातले मतभेद समोर आले आणि ते मातोश्रीपासून दूर गेले.. या सगळ्यात मीनाताई ठाकरे यांच्या निधनानंतर बाळासाहेबांना कुटुंबात एकमेव आधार होता तो म्हणजे उद्धव ठाकरेंचा. राजकारणात राज ठाकरे बाळासाहेबांच्या साथीला तर होतेच, पण उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या मनात स्वतःची जी जागा निर्माण केली, त्यातूनच बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंच्या भविष्यासाठी एक प्लॅन तयार केला. पण तो प्लॅन अस्तित्वात येण्यापूर्वी त्यांनाही बराच संघर्ष करावा लागणार होता.
राज ठाकरे हे संघटनात्मक काम करत होते आणि प्रत्येक सभेत बाळासाहेबांसोबत असायचे. पण १९९७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे खऱ्या अर्थाने सक्रिय झाले. या निवडणुकीतूनच त्यांनी राजकारणात लक्ष घातलं आणि राजकीय महत्त्वकांक्षाही जागी झाली. पुढे आली ती २००२ ची मुंबई महापालिका निवडणूक. याच निवडणुकीत खऱ्या अर्थाने राज आणि उद्धव यांच्यात मतभेद सुरू झाल्याचं बोललं जातं. कारण, तिकीट वाटपाचा निर्णय स्वतः उद्धव ठाकरे घेत होते आणि राज ठाकरेंच्या समर्थकांना हाटकून डावललं गेल्याचा आरोप झाला. आपल्या लोकांचं तिकीट कापलं जातंय ही भावना तयार झाली आणि राज-उद्धव यांच्यातली दरीही वाढत गेली. राज आणि उद्धव यांच्यात बाळासाहेबांचा उत्तराधिकारी कोण होणार ही चर्चा दररोज माध्यमांमधून होत होती. पण याला पुढे खुद्द राज ठाकरेंनीच पूर्ण विराम दिला..
जानेवारी २००३ मध्ये शिवसेनेचं महाबळेश्वरमध्ये अधिवेशन भरलं. ३० जानेवारीला बाळासाहेब आपल्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा करणार होते. या अधिवेशनात उद्धव ठाकरेंची शिवसेनेचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.. या निवडीचा प्रस्ताव दुसरा तिसरा कुणी नाही तर खुद्द राज ठाकरेंनीच मांडला.. शिवसेनेत एका नव्या युगाची सुरुवात झाली आणि शिवसैनिकांसाठी आता उद्धव ठाकरेंचाही आदेश अंतिम मानला जाऊ लागला. यात नारायण राणेंसारख्या नेत्यांचे उद्धव ठाकरेंसोबत खटके उडू लागले.. राणेंनी अखेर पक्ष सोडला.. पण बाळासाहेब उद्धव ठाकरेंच्या पाठिशी राहिले.. पुढे राज ठाकरे यांनीही माझा वाद माझ्या विठ्ठलाशी नसून त्यांच्या भोवतालच्या बडव्यांशी आहे म्हणत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला..
उद्धव ठाकरे यांनी स्वतःला १९९७ पासून अनेकदा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत स्वतःला सिद्ध करुन दाखवलं.. २००२ च्या ज्या निवडणुकीत राज आणि उद्धव यांच्यातली दरी वाढली, त्या निवडणुकीतही शिवसेनेने भगवा फडकवला होता. कुटुंब असो की राजकारण, उद्धव हे बाळासाहेबांचे नेहमी लाडके राहिले. भावाभावांमधला संपत्तीचा वाद जेव्हा समोर आला तेव्हा त्यातही बाळासाहेबांनी सगळं काही उद्धव ठाकरे आणि कुटुंबातल्या इतर सदस्यांच्या नावावर केल्याचं समोर आलं. जयदेव ठाकरे यांनी संपत्तीसाठी कोर्टात लढा दिला, त्यात त्यांना यश आलं नाही.. राजकारणाची आवड नसलेल्या आपल्या मुलाला बाळासाहेबांनी पुढे कार्यकारी अध्यक्ष बनवलं, पुढे ते शिवसेना प्रमुख झाले.. हेच उद्धव ठाकरे आज त्यांच्या कारकीर्दीतल्या सर्वात मोठ्या संकटाचा सामना करतायत.. पक्षही फुटलाय आणि सत्ताही गेलीय.. पण शिवसैनिकांच्या प्रेमाच्या बळावर स्वार होऊन उद्धव ठाकरे पुन्हा उभारी घेतील का ते येणारा काळ ठरवणार आहे.