पहिला मतदारसंघ आहे शिर्डी लोकसभा.. इथे २०१४ ला भाजपातून आलेल्या सदाशिव लोखंडेंना शिवसेनेने खासदार केलं.. बबनराव घोलप इथे शिवसेनेचे उमेदवार होते, पण तांत्रिक कारणावरुन त्यांची उमेदवारी बाद झाली आणि लोखंडेंना लॉटरी लागली.. बंडखोरीनंतर आदित्य ठाकरेंनी शिर्डी मतदारसंघ गाठला.. या मतदारसंघात झालेल्या कार्यक्रमात आदित्य ठाकरेंच्या स्टेजवर बबनराव घोलप यांचीही एंट्री झाली.. घोलप यांची एंट्री होताच शिवसैनिकांनी भावी खासदार अशी घोषणाबाजी केली.. घोलप यांची आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमातली एंट्री हा लोखंडेंना थेट मेसेज देणारी होती. सदाशिव लोखंडेंनी दोन वेळा खासदार राहूनही शिवसेनेची साथ सोडलीय, पण शिवसेनेने २०२४ च्या पूर्वीच त्यांना शिर्डीत पर्याय शोधलाय आणि त्याची तयारीही सुरू केलीय.
दुसरा मतदारसंघ म्हणजे हिंगोली लोकसभा.. शिवसेनेचे हेमंत पाटील इथे खासदार आहेत. पण हेमंत पाटलांचं टेन्शन ठाकरेंनी मुंबईतून वाढलंय.. कारण, हेमंत पाटलांचे प्रतिस्पर्धी सुभाष वानखेडे यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केलाय.. माजी खासदार सुभाष वानखेडे मागील एका वर्षा पासून शिवसेनेत जाणार अशी चर्चा सुरू होती. पण वानखेडे यांना मुहूर्त मिळत नव्हता. शिवसेनेचे तीन वेळा आमदार, एक वेळा खासदार राहिलेले वानखेडे यांना अखेर मुहूर्त मिळाला. खासदार हेमंत पाटील यांनी बंडखोरी केल्याने त्यांना जशाच तसे उत्तर देण्यासाठी शिवसेनेनं हुकूमी पत्ता पक्षात आणलाय. अनुभवी पृवश्रमीचे कट्टर शिवसैनिक असलेले माजी खासदार सुभाष वानखेडे यांना शिवसेनेत आणण्यासाठी शिवसेनेला यश आलंय. वानखेडेंच्या घरवापसीमुळे इकडे हेमंत पाटलांचंही टेन्शन वाढणार आहे.
तिसरा मतदारसंघ आहे कळमनुरी विधानसभा.. या मतदारसंघातले जे आमदार आहेत, ते आधी उद्धव ठाकरेंसाठी रडले, पण स्वतःच शिंदे गटात गेले.. या संतोष बांगर यांच्यासाठीही शिवसेना पर्याय शोधतेय.. २०१९ च्या निवडणुकीत बांगर यांच्याविरोधात दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतलेल्या अजित मगर यांनाच शिवसेना पक्षात घेण्याची शक्यता आहे.. २०१९ मध्ये वंचित बहुजन आघाडीवरच्या तिकिटावर अजित मगर यांना उमेदवारी मिळाली होती. मात्र संतोष बांगर यांच्याकडून १० हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. आता अजित मगर शिवसेनेत आल्यास बांगरांच्या मतांचं विभाजन होऊ शकतं. कारण मगर हे मूळ कळमनुरी तालुक्यांतील आहेत आणि त्यांनी सुरुवातीच्या काळात राजीव सातव यांच्यासोबत काँगेसमध्ये काम केलंय. त्यामुळे त्यांचाही जनसंपर्क तितकाच दांडगा आहेत, त्यात त्यांनी अपक्ष लढून जिल्हा परिषद जिंकली होती.
शिवसैनिकच बंडखोरांना धडा शिकवतील याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरेंनी अनेकदा केलाय.. शिवसेना सोडून गेलेल्या आमदार आणि खासदारांना त्यांच्याच मतदारसंघात सक्षम पर्याय पाहण्याची मोहिम शिवसेनेने सुरु केलीय आणि त्याची झलक तीन मतदारसंघात दिसलीय.. इकडे पश्चिम महाराष्ट्र असो की विदर्भ, किंवा मराठवाडा असो की कोकण.. प्रत्येक ठिकाणी ठाकरेंनी नियोजनपूर्वक तयारी सुरू केलीय.. बंडखोरांना पर्याय शोधून ठाकरे २०२४ मध्ये बंडखोरीचा बदला घेण्याचा ठाकरेंनी चंग बांधलाय.