Sushma Andhare join Shivsena : सुषमा अंधारे यांनी मागील काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे-रश्मी ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीत ठाकरे कुटुंबियांचा साधेपणा सुषमा अंधारे यांना कमालीचा भावला होता. फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी मातोश्रीभेटीचं वर्णन केलं होतं. त्याचवेळी त्यांच्या मनात शिवसेनेबद्दल मोठा सॉफ्ट कॉर्नर तयार झाला. याअगोदर सुषमा अंधारे यांना उजव्या विचारसरणीवर तसेच कट्टर पंथीयांवर हल्लाबोल करणाऱ्या नेत्या म्हणून ओळखलं गेलं.

हायलाइट्स:
- सुषमा अंधारे शिवसेनेत प्रवेश करणार
- उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित भगवा ध्वज हाती घेणार
- ठाकरे संकटात साथीची गरज, अंधारे यांच्या भावना
सुषमा अंधारे यांनी मागील काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे-रश्मी ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीत ठाकरे कुटुंबियांचा साधेपणा सुषमा अंधारे यांना कमालीचा भावला होता. फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी मातोश्रीभेटीचं वर्णन केलं होतं. त्याचवेळी त्यांच्या मनात शिवसेनेबद्दल मोठा सॉफ्ट कॉर्नर तयार झाला. याअगोदर सुषमा अंधारे यांना उजव्या विचारसरणीवर तसेच कट्टर पंथीयांवर हल्लाबोल करणाऱ्या नेत्या म्हणून ओळखलं गेलं. त्या आपल्या जाहीर भाषणांमधून आरएसएस, बजरंग दल यांसारख्या उजव्या विचारसणीच्या संघटनांवर तुटून पडायच्या. तसेच अनेकदा त्यांनी शिवसेनेवर देखील सडकून टीका केली आहे. पण सध्या उद्धव ठाकरे यांचे जुने शिलेदार साथ सोडत असताना त्यांच्यासारख्या संयमी नेतृत्वाला साथ द्यायला हवी अशा विचाराने मी शिवसेनेत प्रवेश करतेय, शिवसेना पक्षप्रवेशामागे मला काहीतरी मिळेल, अशी माझी अपेक्षा नाही, असं सुषमा अंधारे यांनी सांगितलं.
हा माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनातला सर्वांत मोठा निर्णय आहे. शिवसेना प्रवेश मला काय देणार, असा अनेकांचा प्रश्न असेल. आता काय द्यायचं आणि काय घ्यायचं? हा खरंतर मुद्दाच नाही. शिवसेनेकडून आता काही अपेक्षाही नाहीत. आता माझ्या डोक्यात फक्त एकच आहे की, मी शिवसेनेला काय देऊ शकते. मी काय करु शकते? चांद्यापासून बांद्यापर्यंत जो शिवसैनिक भरकटला आहे. या शिवसैनिकांमध्ये मी कशी एक नवी उमेद जागी करु शकते, हे काम मला करायचं आहे, हे माझ्यापुढचं आव्हान आहे, अशा भावना सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याच्या पूर्वसंध्येला बोलून दाखवल्या.
मागील अडीच वर्षांपासून सुषमा अंधारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जोरदार काम करत होत्या. त्याअगोदर लोकसभा निवडणुकांत आपल्या गणराज्य संघटनेचा पाठिंबा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला होता. २०१९ विधानसभेच्या निवडणुकीवेळी त्यांनी आपल्या भाषणांनी प्रचारसभा गाजवल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असताना सुषमा अंधारे यांना विधान परिषदेची आमदारकी मिळेल, असं वाटत असताना पक्षाने त्यांच्याऐवजी आक्रमक चेहरा म्हणून अमोल मिटकरी यांची वर्णी लावली. तेव्हापासून त्या नाराज असल्याची चर्चा होती. गेल्या काही दिवसांपासून सचिन अहिर यांच्या माध्यमातून त्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अखेर त्या चर्चांवर शिक्कामोर्तब झालं आहे. आज दुपारी १२ वाजता त्या अधिकृतरित्या शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेतील.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.