मुंबई : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सत्ता स्थापन होऊन महिना उलटत आला, तरी मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. त्यातच मुख्यमंत्र्यांच्या वारंवार दिल्ली दौऱ्यांवरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. बुधवारी संध्याकाळी सहाव्यांदा दिल्ली दरबारी निघालेल्या शिंदेंचा दौरा एका दिवसाने पुढे ढकलण्यात आला, मात्र त्याआधीच त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराची आणखी एक डेडलाईन सांगितली. येत्या तीन दिवसात महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं एकनाथ शिंदेंनी माध्यमांना सांगितलं.

शिंदेंच्या म्हणण्यानुसार कॅलेंडरचं पान उलटण्यापूर्वीच राज्याला नवीन मंत्रिमंडळ मिळायला हवं. येत्या चार दिवसात जुलै महिना संपत आहे. त्यामुळे ३१ जुलैच्या आधी कॅबिनेट विस्ताराला मुहूर्त मिळण्याची चिन्हं आहेत. आज आषाढी अमावस्या आहे. त्यामुळे श्रावणातच मंत्रिमंडळाला नवी पालवी फुटणार, असं दिसत आहे. आज आणि उद्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारीही दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यामुळे ३० किंवा ३१ जुलैला हा विस्तार होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कॅबिनेट विस्तार एका टप्प्यात करायचा की दोन, याविषयी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम निर्णय घेतला नसल्याचं समजतं. दिल्ली दौऱ्यात शिंदे मंत्रिमंडळ विस्तार, वाटप यावर शिक्कामोर्तब करुन येण्याचे संकेत आहेत.

हेही वाचा : आंबेडकरी विचारांची धडाडती तोफ शिवसेनेत प्रवेश करणार, ठाकरेंच्या संकटात बहीण साथीला!

दोन टप्प्यात मंत्रिमंडळ विस्तार ठरल्यास
पहिल्या टप्प्यात एकूण – १९ – कॅबिनेट मंत्री
भाजप – १२
शिंदे गट – ०७

एका टप्प्यात मंत्रिमंडळ विस्तार ठरल्यास –
एकूण – ४० मंत्री
भाजप – २६
शिंदे गट – १४

हेही वाचा : “आंबे कापून खाता की चोखून खाता? किमान असे प्रश्न तरी ठाकरेंना विचारले नाहीत”

गुजरात पॅटर्नची चर्चा

गुजरातमध्ये एकाही माजी मंत्र्याला पुन्हा मंत्रिपद देण्यात आले नव्हते. मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल हेही तसे नवखेच. त्यामुळे शिंदे-फडणवीस कॅबिनेट विस्तारातही हा पॅटर्न राबवला जाण्याची चर्चा आहे. त्यामुळे मागील सरकारमध्ये मंत्रिपद भूषवलेले आमदार जरा सावधच आहेत. त्यामुळे शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला संधी मिळणार आणि कोणाचा पत्ता कट होणार, याबाबत तूर्तास फक्त तर्क-वितर्कच लढवले जात आहेत.

हेही वाचा : Maharashtra Politics: शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळ विस्तारात ‘गुजरात पॅटर्न’? म्हणूनच भाजपचे भलेभलेही मूग गिळून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here