मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ६३ वा वाढदिवस काल मोठ्या थाटात संपन्न झाला. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिकांनी एकच गर्दी केली होती. शिवसेना नेते-उपनेते, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, हजारो शिवसैनिकांनी काल मातोश्रीवर गर्दी केली होती. त्यामध्ये दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत होते. एकनाथ शिंदे यांच्या रुपाने शिवसेनेसाठी पर्यायाने उद्धव ठाकरेंसाठी ठाण्यामधून आव्हान उभं राहिलेलं असताना दिघेंचे पुतणे उद्धव ठाकरेंची साथ देतायत. काल मातोश्रीवर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांचं अभिष्टिचिंतन केलं, त्यांना वाढदिनी शुभेच्छा दिल्या. त्यांनी केलेल्या फेसबुक पोस्टदेखील चर्चेचा विषय ठरला. उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना त्यांनी एकनाथ शिंदेंसह भाजपवर टीकास्त्र सोडलं. एकनाथ शिंदे सातत्याने जाहीर सभांमधून, भाषणांमधून आनंद दिघे यांचं नाव घेत असताना त्यांचे पुतणे केदार दिघे मातोश्रीसाठी खिंड लढवत आहेत, हे विशेष… काल मातोश्रीवर आलेल्या केदार दिघे यांचंही जोरदार स्वागत करण्यात आलं. शेकडो शिवसैनिकांनी मोठ्या जयघोषात आणि शिवसेनेच्या जयजयकाराने केदार दिघे यांचं वेलकम केलं. ठाकरेंच्या वाढदिनी मातोश्री परिसरात केदार दिघे यांची हवा पाहायला मिळाली.

शिवसेनेतील बंडाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला विशेष महत्त्व असल्याने शिवसैनिकांनी दरवर्षीपेक्षा यंदा मोठी गर्दी केली होती. मातोश्रीवर मोठी सजावटही करण्यात आली होती. मातोश्रीबाहेर छोटेखानी मंच उभारण्यात आला. तिथेच उभे राहून उद्धव ठाकरे शिवसैनिकांकडून शुभेच्छा स्वीकारत होते. यावेळी एका ज्येष्ठ शिवसैनिकाने शेरोशायरी म्हणत उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. जमाना हमसें है-हम जमाने सें असं म्हणत आलेले संकट परतवून लावण्यासाठी आपण एकदिलाने पुन्हा काम करु आणि या संकटातून बाहेर पडू असा संदेशच या ज्येष्ठ शिवसैनिकाने उद्धव यांना दिला. दुसरीकडे शिवसेनेसोबत असलेल्या आमदार-खासदार-पदाधिकाऱ्यांनी गर्दी करुन आम्ही तुमच्यासोबत आहोत, हे दाखविण्याचा एकप्रकारे प्रयत्न केला.

पर्याय शोधले, तयारीला लागले, उद्धव ठाकरेंचे ३ एक्के, ज्यामुळे बंडखोरांना निवडून यायचं मुश्किल!
दिघे यांचे पुतणे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत अधिक सक्रिय झाले आहेत. फुटीर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सगळ्या समर्थक आमदारांवर ते वेळोवेळी तुटून पडून ठाकरेंप्रती आपली निष्ठा व्यक्त करताना दिसून येत आहेत. कालही उद्धव ठाकरे यांच्या वाढदिनी केदार दिघे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली, अभिष्टचिंतन केलं, त्यांना सहृदयी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत खासदार अरविंद सावंत देखील उपस्थित होते. “त्या ४० जणांनी स्वतःच्या पक्षप्रमुखाला, बाळासाहेबांनी निवडलेल्या वारसाला सत्ताधीश दिल्लीश्वरांसमोर झुकवण्याचे षडयंत्र रचले. पण आपण झुकला नाहीत, या संकटात ही सर्वसामान्य शिवसैनिकांना बळ दिलेत. हाच तो महाराष्ट्र बाणा… हाच ठाकरी बाणा! आम्हास अभिमान आहे शिवसेना पक्ष नेतृत्वाचा, अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या सदिच्छा दिल्या.

शिवसेना खासदाराच्या घरात फूट, मोठा भाऊ शिंदे गटात, धाकटा ठाकरेंसोबत
“शिवसेना ही कोणत्याही नेत्यामुळे नाही तर सामान्य शिवसैनिकांमुळे उभी राहिली आहे. पक्षात कोणता नेता राहिला किंवा न राहिला, शिवसैनिकांना बाळासाहेबांच्या विचारांचा आधार आहे. गद्दारांना क्षमा नाही, हे दिघे साहेबांचं ब्रीदवाक्य आहे. त्यामुळे शिवसेना याहून जोमाने पुढे जाईल”, असं सांगत केदार दिघे यांनी एकनाथ शिंदेंनी पक्षनेतृत्वाच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेवर टीका केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here