सन २०१४ पासून आतापर्यंत सरकारी खात्यांमध्ये नव्याने भरतीसाठी आलेल्या अर्जांबाबत लोकसभेत प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना कार्मिक राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी भरतीची आकडेवारी सादर केली आहे. ते म्हणाले की २०१४ पासून आतापर्यंत एकूण २२,०५,९९,२३८ अर्ज प्राप्त झाले आहेत.
केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांची माहिती…
लोकसभेत त्यांच्या लेखी उत्तरात केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, उत्पादन लिंक्ड इंसेंटिव्ह योजना २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ६० लाख नवीन रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. इतकंच नाहीतर, भारत सरकारने देशात रोजगार निर्मितीसाठी अनेक पावले उचलली आहेत.
कोणत्या वर्षी किती नोकऱ्या मिळाल्या?
वर्ष नोकऱ्यांची संख्या
२०१४-१५ १,३०,४२३
२०१५-१६ १,११,८०७
२०१६-१७ १,०१,३३३
२०१७-१८ ७६,१४७
२०१८-१९ ३८,१००
२०१९-२० १,४७,०९६
२०२०-२१ ७८,५५५
२०२१-२२ ३८,८५०
१० लाख नोकऱ्यांचं उद्दिष्ट
पंतप्रधान मोदींनी सर्व विभाग आणि मंत्रालयांमध्ये नवीन भरतीबाबत सूचना दिल्या होत्या. याअंतर्गत येत्या दीड वर्षात १० लाख लोकांना नोकऱ्या देण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. केंद्र सरकारच्या विविध विभाग आणि मंत्रालयांतर्गत ही भरती केली जाणार आहे.
दोन वर्षांत दीड लाख लोकांना रोजगार
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार, २०२०-२०२१ मध्ये १,५९,६१५ उमेदवारांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यापैकी ८,९१३ उमेदवारांची यूपीएससीद्वारे निवड झाली आहे. तर एसएससीद्वारे ९७,९१४ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे आणि ५२,७८८ उमेदवारांची आयबीपीएसद्वारे निवड करण्यात आली आहे.