वृत्तसंस्था, टोकयोः जपानच्या नैऋत्य भागांतील शहरात माकडांकडून हल्ले होण्याचे प्रकार वाढले आहेत. ही माकडे नर्सरी शाळांमध्ये घुसतात, चावे घेतात, पंजा मारतात आणि लहान मुलांना हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असल्याने भीतीचे वातावरण आहे. आठ जुलैपासून आत्तापर्यंत सुमारे ५८ जणांवर माकडांनी हल्ले केले आहेत. यामागुची सिटी हॉलने ट्रँक्विलायझर बंदुकीने या माकडांची शिकार करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे.

ही माकडे खाद्यपदार्थांकडे ढुंकूनही पाहत नसल्याने त्यांच्यासाठी लावले जाणारे सापळे कुचकामी ठरत आहेत. लहान मुले आणि मोठ्यांवर ते हल्ले करत आहेत. ‘माकडे इतकी हुशार आहेत की ती मागून हल्ले करतात आणि पाय पकडतात’, असे अधिकारी मासाटो सेटो यांनी सांगितले. व्हरांड्यात कपडे धुत असताना एका महिलेवर माकडाने प्राणघातक हल्ला केला. तर आणखी महिलेच्या बोटांना माकडांमुळे दुखापत झाली.

ट्रँक्विलायझर बंदुकीच्या साह्याने सात किलो वजनाच्या एका माकडाला मंगळवारी पकडण्यात आले. हे माकड हल्ला करणाऱ्या माकडांपैकी एक असून, विविध तपासण्या केल्यानंतर या माकडाला ठार मारण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, त्यानंतरही आणखी हल्ले होतच राहिले. आत्तापर्यंत कुणालाही गंभीर दुखापत झाल्याची नोंद नसली तरी कुणावर हल्ला झाल्यास त्याला रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याचा सल्ला दिला जात आहे. हे हल्ले का झाले आणि माकडांची टोळी नेमकी कुठून आली ते अद्याप कळू शकलेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here