हनुमंत भाऊ निकम (वय ७०) वर्ष आणि कमल हनुमंत निकम (वय ६५) या नवरा-बायकोची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. धक्कादायक बाब म्हणजे या हत्येची माहिती तब्बल दोन दिवसानंतर समजली होती.
या दुहेरी हत्येमध्ये असलेले आरोपी फरार होते. पती-पत्नी हे वृद्ध दाम्पत्य एकटेच घरात रहात होते. सकाळपासून घरात दिसत नसल्याचं पाहून शेजाऱ्यांनी घरात पाहिलं असता ते मृत अवस्थेत आढळून आले होते. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करुन दोन्ही मृतदेह शवविच्छेनासाठी पाठवण्यात आले यामध्ये या वृद्ध दाम्पत्याचा तोंडावर उशी दाबून मृत्यू झाल्याचं अहवालात स्पष्ट झालं आहे. सुरूवातीला पोलिसांना तपासात यश येत नव्हते. मात्र, एलसीबी टीमने पुसेगावमध्ये तळ ठोकत तांत्रिक तपासाच्या आधारे या हत्येचा छडा लावण्यात यश मिळवलं.
हत्या करून चोरलेले दागिने कराडमधील एका सोनाराला विकल्याचं सुद्धा या तपासात समोर आलं असून विशेष बाब म्हणजे एक आरोपी दाम्पत्याच्या अंत्यविधीला देखील हजर होता. यामध्ये पोलिसांचा तपास कसा चालू आहे याची माहिती तो घेत होता. पोलिसांना त्याला जबाबासाठी बोलावल्यानंतर तो हजर देखील झाला. मात्र, तांत्रिक तपासाच्या आधारे सतीश शेवाळेच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. सातारा पोलिसांना या क्लिष्ट गुन्ह्याची उकल करण्यात यश आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत दिली.