दोन गटांमध्ये सुरू झालेल्या वादाचं रुपांतर मारहाणीत झालं. हरियाणातून आलेल्या कावड यात्रेकरूंनी मुझफ्फरपूरहून आलेल्या भाविकांवर काठीनं हल्ला केल्याचं रुडकीचे एसएचओ देवेंद्र सिंह चौहान यांनी सांगितलं. हल्ल्यात जखमी झालेल्या जवानाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. याशिवाय दोन ट्रक आणि सात मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. ही वाहनं कावड यात्रेकरूंची आहेत, असं चौहान म्हणाले.
आम्ही हरिद्वारहून पाणी भरून दुचाकीवरून येत होते. बरीच गर्दी होती. सगळे जण चल भोले, चल भोलेची घोषणा देत होते. तितक्यात त्यांच्या गटातील एक जण आला आणि त्यानं धक्का दिला, अशा शब्दांत कार्तिक बालियान यांच्यासोबत कावड घेऊन जात असलेल्या सुखविंदर कुमार यांनी घटनाक्रम सांगितला. ‘त्यांच्यातील एकानं धक्का मारला. मात्र आम्ही काही बोललो नाही. त्यानंतर त्यांच्या गटातला आणखी एक जण आला आणि त्यानं कार्तिकला धक्का दिला. आम्ही तरीही शांत होता. नेमकी समस्या काय आहे? तुम्ही का असं करत आहात?, अशी विचारणा आम्ही त्यांच्याकडे केली,’ असं कुमार म्हणाले.
आम्ही शांतपणे बोलत असताना त्यांनी अचानक हल्ला सुरू केला. त्यांच्याकडे धारदार शस्त्रं होती. काठ्यादेखील होत्या. जवळपास ५० ते ६० जणांनी आमच्यावर हल्ला केला. कार्तिकसह आम्हा सगळ्यांनाच त्यांनी जबर मारहाण केली. हल्ल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात कार्तिकचा मृत्यू झाला, असा घटनाक्रम कुमार यांनी सांगितला.