आंबेडकरी विचारांची धडाडती तोफ, गेल्या पंधरा वर्षांपासून फुले-आंबेडकरी विचार वाडी-वस्ती-तांड्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या वक्त्या तसेच मागील काही काळापासून राष्ट्रवादी काँग्रेसची साथ देणाऱ्या सुषमा अंधारे यांच्या हाती शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी शिवबंधन बांधलं. हा पक्षप्रवेशाचा सोहळा मातोश्रीच्या प्रांगणात पार पडला. या सोहळ्याला स्वत: उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, उपनेत्या नीलम गोऱ्हे, आमदार सचिन अहिर, तथा शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. सुषमा अंधारे यांच्यासह त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी देखील सेनेचा भगवा झेंडा हाती घेतला. सुषमा अंधारे यांच्या रुपाने शिवसेनेला सभा गाजवणाऱ्या आक्रमक नेत्या तसेच ठामपणे बाजू मांडणाऱ्या निडर नेत्या मिळाल्या आहेत. ठाकरे कुटुंब संकटात असताना एक बहीण म्हणून आपण त्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली आहे.
पक्षप्रवेशानंतर सुषमा अंधारे म्हणाल्या, “कालपासून मला माध्यमांचे प्रतिनिधी विचारतायेत, शिवसेनेत कुठलं लाभाचं पद असेल. त्यांना मी सांगितलं, माझ्या डोक्यावर ना ईडी फाईल्सचं ओझं आहे ना कुठला गैरव्यवहार केलाय. मला शिवसेनेत जागा हवी असेल तर शिवसैनिकांच्या हृदयात, प्रत्येक शिवसैनिकाची बहिण म्हणून मला त्यांचं प्रेम पाहिजे. मला अजूनही शिवसेनेतील पीठा-मीठाचे, चहा-साखरेचे डबे माहिती नाहीत, येथील पद्धती माहिती नाहीत. त्यामुळे मला सांभाळून घ्या. निलमताई गोऱ्हे या मला आईप्रमाणे सांभाळून घेणाऱ्या आहेत. तर सचिन अहिर यांच्या रुपाने माहेरचा माणूस माझ्यासोबत आहे. मी आपल्या सगळ्यांच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही. आज जोरजोरात गळे काढून रडायचे आणि नंतर दुसऱ्या गटात सामील व्हायचे, असा प्रकार माझ्याकडून घडणार नाही”, असा विश्वास सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.