शिवसेनाप्रमुखांनी अनेक सामान्यांना असामान्य केलं. आता ते असामान्य झालेले लोक ‘विशेष सामान्य’ होण्यासाठी निघून गेले आहेत. त्यामुळे आता परत एकदा सामान्यातून असामान्य माणसं घडवण्याची वेळ आली आहे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी सामान्य शिवसैनिकांना साद घातली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आंबेडकरी चळवळीतील आघाडीच्या कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांचे पक्षात स्वागत केले. त्यांनी म्हटले की, सुषमाजी तुम्ही तुमच्यासोबत सैनिक घेऊन आला आहात. हे सैनिकही कोणत्या वेळेला आलेत तर, लढाई ऐन भरात असताना आले आहेत. याच साथीसोबतीला महत्त्वं असतं. पूजा असली की तीर्थप्रसादाला सगळेच येतात. पण कठीण प्रसंग आल्यावर मैदानात खांद्याला खांदा लावून लढणाऱ्यांचं महत्त्व आयुष्यभर राहते, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
शिवसेनेत प्रवेश करताच सुषमा अंधारे यांना मोठी जबाबदारी
सुषमा अंधारे यांनी गुरुवारी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घेताच त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पक्षात प्रवेश केल्याबरोबर त्यांनी अंधारे यांची नियुक्ती शिवसेनेच्या उपनेतेपदी केली. यावेळी आगामी काळात ग्रामीण भागांतून कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर नोंदणी झाली पाहिजे, अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांच्याकडून व्यक्त केली.
कपटी मित्रांपेक्षा दिलदार शत्रू परवडतात: सुषमा अंधारे
मी आपल्या सगळ्यांच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही. आज जोरजोरात गळे काढून रडायचे आणि नंतर दुसऱ्या गटात सामील व्हायचे, असा प्रकार माझ्याकडून घडणार नाही, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले. मी शिवसेनेवर पूर्वी जरूर टीका केली आहे. पण माझं जे बोलायचं होते ते बोलून झालंय, आता सर्व गोष्टी क्लिअर आहेत. कपटी मित्रांपेक्षा दिलदार शत्रू परवडतात. त्यामुळे मी कधीकाळी शिवसेनेवर टीका केली असेल. पण आज संविधानाच्या शत्रूंविरोधात लढण्यासाठी मी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली काम करायला तयार आहे, असेही सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले.