यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराला झालेल्या विलंबावरून प्रश्न उपस्थित करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही फटकारले. ज्या लोकांनी ३२ दिवस पाच लोकांचे सरकार चालवले त्यांना आम्हाला प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार नाही. आमचं मंत्रिमंडळ लवकरच स्थापन होईल. त्यामुळे कुठलंही काम अडकून राहणार नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
फडणवीसांचा अजितदादांना टोला
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून शिंदे-फडणवीस सरकारला घेरायला सुरुवात केली आहे. राज्य सरकारने मंत्रिमंडळ आणि पालकमंत्री नेमलेले नाहीत. त्यामुळे राज्यात पूरपरिस्थिती आणि ओला दुष्काळ असताना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कोणीही नाही, असा आरोप अजित पवार यांनी केला होता. त्यांच्या या आरोपला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. आमचे सरकार लवकरच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देईल. तुमच्या सरकारसारखं आमचं सरकार नाही. तुमच्या काळात दुष्काळ, नैसर्गिक संकट आणि वादळानंतर मदत जाहीर होऊन ७ महिने ती मिळालीच नाही. पण आता राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतीचे ५० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यामध्ये रोज १० टक्क्यांची वाढ होत आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात १०० टक्के पंचनामे पूर्ण होतील. त्यानंतर आमचे सरकार शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आम्ही जुन्या सरकारसारखं केंद्र सरकार मदत देईल तर करू, असं वागणार नाही. केंद्र सरकारला मदतीसाठी प्रस्ताव जरूर जाईल. पण त्यांच्या मदतीची वाट न पाहता शिंदे साहेबांच्या नेतृत्त्वाखालील सरकार शेतकऱ्यांना राज्याच्या तिजोरीतून मदत देईल, असे फडणवीस यांनी म्हटले.