रत्नागिरी: जिल्ह्यात आज एकाच दिवशी तब्बल २२ रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्हावासीय हादरले आहेत. आज एकूण २४ अहवाल प्राप्त झाले असून त्यातील २२ अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

रत्नागिरीत एकाच दिवशी करोनाचे एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण प्रथमच आढळले आहेत. यामध्ये मंडणगड तालुक्यातील ११, दापोलीतील ४, रत्नागिरीतील ७ रुग्णांचा समावेश आहे. रत्नागिरीत सापडलेल्या ७ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ४ महिला असून ३ पुरुष आहेत. मंडणगडमधील ११ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ७ पुरुष व ४ महिला आहेत तर दापोलीत सापडलेले चारही पॉझिटिव्ह रुग्ण पुरुष आहेत. त्यामुळे आता रत्नागिरी जिल्ह्यातील अॅक्टिव्ह करोनाबाधित रुग्णांची संख्या ७४ इतकी झाली आहे. यातील बहुतांश रुग्ण मुंबईतून गावी आलेले असल्याने प्रशासन हादरलं आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आणि भागातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी रत्नागिरी जिल्ह्यात दाखल होत असून त्यातून करोनाबाधित रुग्ण आढळल्याने व जिल्ह्यातील रुग्णसंख्या अचानक वाढल्याने जिल्हा प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी यांना आधीच या स्थितीवर चिंता व्यक्त केलेली आहे. रत्नागिरीत बाहेरून मोठ्या संख्येने येत असलेल्या लोकांमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे, असे मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. जिल्ह्यात करोनाच्या केवळ ४०० रुग्णांवरच उपचार होतील, इतक्याच बेडची व्यवस्था असल्याचेही सांगण्यात आले होते. असे असतानाच आज एकाच दिवशी २२ रुग्णांची भर पडल्याने आरोग्य व प्रशासकीय यंत्रणांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here