प्रयागराज: उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधील प्रतिष्ठित शाळांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या कारनाम्यामुळे संपूर्ण शहर हादरलं. गेल्या तीन महिन्यांपासून शहरात बॉम्बस्फोटांची मालिका सुरू होती. या प्रकरणी पोलिसांनी काल ११ जणांना अटक केली. परिसरात आपलं वर्चस्व निर्माण करण्याच्या हेतूनं दोन गटांमध्ये संघर्ष सुरू होता. हा संघर्ष थेट बॉम्बस्फोट घडवण्यापर्यंत पोहोचला. धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेल्या ११ जणांपैकी १० जण अल्पवयीन आहेत. त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या गटांशी त्यांच्या पालकांचादेखील संबंध असल्याचं दिसून आलं. त्यांना पोलिसांकडून इशारा देण्यात आला आहे. स्फोट घडवणाऱ्यांविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील प्रतिष्ठित शाळांमधील विद्यार्थ्यांनी त्यांच्या टोळ्या तयार केल्या होत्या. परिसरात आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू होता. वचक बसवण्यासाठी त्यांनी बॉम्बस्फोट घडवले.
धक्कादायक! ओव्हरटेकिंगवरून वाद; कावड यात्रेकरूंची जवानाला बेदम मारहाण; अर्ध्या तासात मृत्यू
विद्यार्थ्यांच्या टोळ्या व्हॉट्स ऍपवरही सक्रिय होत्या. तांडव, जॅग्वार, माया, लॉरेन्स, इम्मॉर्टल्स अशा नावांनी त्यांनी व्हॉट्स ऍप ग्रुप तयार केले होते. त्यात १० ते ३०० सदस्य होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. जुलैमध्ये शाळांच्या बाहेर बॉम्बस्फोटाच्या ५ घटना घडल्या. यातील पहिली घटना संगम परिसरात घडली. एका शाळेचे विद्यार्थी त्यांच्यातील एकाचा वाढदिवस साजरा करत असताना स्फोट घडवण्यात आला.

बॉम्बस्फोटाची दुसरी घटना एमपीव्हीएमजवळ घडली. यानंतर पतंजली ऋषीकुल, बॉईज हायस्कूल, बिशप जॉन्सन स्कूल परिसरात स्फोट झाले. सोमवारी बिशप जॉन्सन कॉलेजजवळ पोलिसांनी अनेक विद्यार्थ्यांना पकडलं. बॉम्ब कुठून आणले याबद्दल त्यांना विचारणा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड झाली. आपण बॉम्ब कुठून आणले नाहीत, तर घरातच यूट्यूब पाहून तयार केल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.
संदीप कोरगावकरची आत्महत्या; पोलिसांनी चक्रं फिरवली अन् तब्बल ३०० कोटींचा घोटाळा उघड
बाजारातून फटाके खरेदी करायचे, त्यातील दारुगोळा वेगळा करायचा. तो बॉम्बच्या निर्मितीसाठी वापरायचा. हा प्रकार गेले काही महिने सुरू होता. शाळेतील विविध उपक्रमांच्या नावाखाली विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांकडून पैसे घेतले आणि याच पैशांचा वापर बाजारातून फटाके खरेदी करण्यासाठी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here