या प्रकरणात आणखी सात आरोपी आहेत. सगळे एकाच कुटुंबातील आहेत. त्यांच्या विरोधातला खटला उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर ऑगस्टमध्ये सुनावणी होईल, अशी माहिती शर्मांनी दिली. बेरोजगार असलेले वडील अतिशय क्रूरपणे वागायचे. त्यांचं क्रौर्य आम्ही कित्येकदा पाहिलं, अशा शब्दांत दोन बहिणींनी त्यांच्या कटू आठवणी सांगितल्या.
मनोज बन्सल यांचा विवाह २००० साली अनू यांच्याशी झाला. त्यांना दोन मुली झाल्या. मात्र मनोज यांना वंशाचा दिवा होता. त्यासाठी त्यांनी पाचवेळा अनू यांना गर्भपात करायला लावला. १४ जून २०२६ रोजी मनोज यांनी अनू यांना केरोसिन टाकून पेटवलं. ही घटना तान्या आणि लतिका यांनी पाहिली. लतिकानं मदतीसाठी तिच्या आजीला (आईच्या आईला) बोलावलं. अनू यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथून त्यांना दिल्लीला हलवण्यात आलं. मात्र २० जूनला त्यांचं निधन झालं.
या प्रकरणी अनू यांच्या आई ओमवती यांनी एफआयआर नोंदवला. मनोज आणि अन्य सात जणांवर त्यांनी आरोप केले. आपल्या आईला न्याय मिळावा यासाठी तान्या आणि लतिका यांनी तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना रक्तानं पत्र लिहिलं होतं. त्यामुळे हे प्रकरण चर्चेत आलं. पोलिसांनी सुरुवातीला हत्येचं कलम लावलं होतं. मात्र त्यानंतर त्यांनी ते बदललं आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचं कलम लावलं. त्याला तान्या आणि लतिका यांच्या वकिलांनी न्यायालयात आव्हान दिलं. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं.