अंबरनाथ, कुळगाव बदलापूर नगरपालिकेची ओबीसी आरक्षण नुकतीच पार पडली आहे. त्यामुळे या शहरांमधील प्रभागांचे आणि निवडणुकांचे चित्र स्पष्ट झालं आहे. आता सर्वपक्षीय इच्छुकांनी निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. मतदारांशी संपर्क साधण्यासाठी इच्छुकांनी आता पावसाळ्याचा मुहुर्त साधला आहे.
पावसाळ्याचे वातावरण अनुभवण्यासाठी त्यांना वर्षा सहलीला नेण्याचे नियोजन केले जाते आहे. त्यातच आता अंबरनाथ मधील मनसेचे माजी नगरसेवक कुणाल भोईर आणि माजी नगरसेविका अपर्णा भोईर यांनी जेष्ठ नागरिक आणि महिलांसाठी वर्षा सहल आयोजित केली असून त्याचा बॅनर व्हायरल केला आहे. त्यात ‘काय झाडी, काय डोंगर, सहल एकमद ओक्के’! हे संवाद टाकले आहेत. त्यामुळे या बॅनरची आता चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे.
राज्यात गेल्या महिन्यात झालेल्या राजकीय उलथापालथीत सर्वाधिक चर्चेच्या ठरलेल्या सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांचा संवाद आता प्रचारासाठी वापरला जातो आहे. ‘काय झाडी, काय डोंगर’ म्हणत नागरिकांना वर्षा सहलीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन मनसे तर्फे केलं जात आहे.