अमळनेर शहरातील सुभाष चौकातील एक महिला तिच्या मुलांना गांधलीपुरा भागात विक्री करत आहे व तिच्याकडे सात मुले असल्याची माहिती अमळनेर पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी या प्रकाराची खात्री करण्यासाठी कर्मचारी नाजिमा पिंजारी, पोलीस नाईक दिपक माळी, पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र पाटील यांना रवाना केले. कर्मचाऱ्यांनी चौकशी केली असता, याठिकाणी तीन मुलांची विक्री केल्याचे समोर आले. कर्मचाऱ्यांनी तीन मुली व चार मुले अशा एकूण सातही मुलांसह त्याच्या आईला पोलीस ठाण्यात आणले.
महिलेचे करुन कहाणी ऐकून पोलीस हेलावले
पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी मुलांच्या विक्रीबद्दल आईला विचारले असता, करुण कहाणी समोर आली. साहेब, करोना काळात माझा नवरा मेला. एका पाठोपाठ सात मुलांचा जन्म झाला आहे. यांचे पोट कसे भरू? म्हणून माझा नाईलाज आहे. ज्याला गरज आहे त्याला बाळ देऊन टाकलं, दिवसभर रस्त्यावर भटकून आणि भीक मागूनसुद्धा पोटच्या सात गोळ्यांचे पोट भरू शकत नाही म्हणून अशी महिलेची करुन कहाणी ऐकल्यावर पोलीसही हेलावले.
मुले बालसुधारगृहात; आई आशादीप वसतीगृहात
ज्यांनी मुलांना खरेदी केलं होते, त्यातील काही वृद्ध होते, तर काहींना मुलबाळ नव्हते. वृद्धापकाळात आधार असावा म्हणून संबंधितांनी मुले घेतल्याचे समोर आले आहे. मात्र ही प्रक्रिया बेकायदेशीर आहे. अशा मुलांच्या पालनपोषणसाठी बालसुधारगृह आहे, असे सांगत पोलीस निरिक्षक जयपाल हिरे यांनी त्या परिस्थितीसमोर मजबूर झालेल्या मातेची समजूत काढली.
जळगाव येथे महिला बाल कल्याण समितीचे प्रदीप पाटील व कर्मचारी यांना बोलावून घेतले. पोलीस उपनिरिक्षक नरसिंग वाघ, नाजिमा पिंजारी, दिपक माळी, रविंद्र पाटील यांनी महिलेसह बालकांची वैद्यकीय तपासणी करून तिला जळगाव येथे नेले. तीन मुली व चार मुले अशा एकूण सातही मुलांना जळगाव येथील बालसुधागृहात दाखल करण्यात आले. तर महिलेला जळगावच्या शासकीय महिला आशादीप वसतीगृहात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस निरिक्षक जयपाल हिरे यांनी बोलताना दिली आहे.
बालकांना अशा पद्धतीने त्यांच्या आई वडिलांकडून विकत घेणे हे बेकायदेशीर आहे. कोणी असा प्रकार केल्यास त्यांच्या विरुद्ध प्रचलीत कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे इशारा अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी दिला आहे.