काही दिवसांपूर्वी तिरूमला तिरुपती देवस्थान येथे बालाजी भगवान यांच्या दर्शनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील भाविकांच्या गाडीवरील छत्रपती शिवरायांचे स्टिकर व गाडीत असलेला पुतळा काढल्याशिवाय तुम्हाला दर्शन घेता येणार नाही, अशी आडमुठी भूमिका तेथील चेक पोस्टवर घेण्यात आली. यामुळे महाराष्ट्रातील त्या शिवभक्ताने सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून दर्शन न घेता तो भाविक परत आला. या संदर्भात महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील येहळेगाव तुकाराम येथील शिवभक्त शिवसैनिक संतोष काळे यांनी याबाबतीत आमदार संतोष बांगर साहेब यांना फोनवरून ही बाब सांगितली. त्यानंतर आमदार संतोष बांगर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
शिवभक्त शिवसैनिक संतोष काळे यांनी आमदार संतोष बांगर यांना ही माहिती दिल्यानंतर आमदार बांगर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. हे प्रकरण आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर टाकले असून ते लवकरच याबाबतीत आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून यावर तोडगा काढतील असे बांगर यांनी म्हटले आहे.
त्या गाड्या फोडून चुराडा करून टाकेन- आमदार बांगर
तसेच उभ्या देशाचे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि माझ्या देवाचा जर तिरुमला तिरुपती देवस्थानातर्फे अवमान होत असेल तर मी देखील आंध्र प्रदेशची एकही गाडी माझ्या भागात फिरू देणार नाही. माझ्या छत्रपतींचा अवमान करणाऱ्या आंध्र प्रदेशच्या गाड्या माझ्या भागात आल्या तर मी त्या गाड्या फोडून चुराडा करून टाकेन, असा सज्जड इशाराच आमदार बांगर यांनी यावेळी दिला.