अनंत साळी, जालना

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर राजकीय वादळ घोंघावत असतानाच पुन्हा एकदा राजकीय वादाचा एखादा नवा अंक सुरू होण्याची चिन्हे दिसत आहे. सध्याच्या राजकीय वातावरणात शिवसेनेचे अनेक खासदार आमदार शिंदे गटात सामील झाले. त्यानंतर आता माजी आमदारांची पाळी आली असून जालन्याचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि त्यांच्या भेटीचे व्हिडिओ, फोटो व्हायरल होताच जालन्याच्या राजकीय वातावरणात मोठी लाट आली आहे. दिल्ली भेटीत अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री, जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने दिलजमाई झाल्याचे कळतेय. मात्र, खोतकरांनी शिंदेकडे लोकसभेची जागा मागितल्याने ती मान्य झाल्यास उद्या खोतकर विरुद्ध दानवे असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

रावसाहेब दानवे यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात सतत दुसऱ्यांदा केंद्रीय राज्यमंत्रिपदाची धुरा सांभाळणाऱ्या रावसाहेब दानवे यांच्या अभेद्य जालना लोकसभा मतदार संघावर अर्जुन खोतकर यांनी आपल्याला संधी देण्याची मागणी यावेळी केल्याने जिल्हाभरातील राजकारणात खळबळ उडाली आहे.आता काय होईल यासाठी तर्क वितर्क लावले जात आहे. जिल्ह्यात भाजपच्या रावसाहेब दानवे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे ते सतत २ ते ३ लाखांच्या मताधिक्याने निवडून येतात. गेल्या लोकसभेत अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात शड्डू ठोकले होते. अखेर देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीने त्यावेळचे खोतकर यांचे बंड थोपवले गेले. पण विधानसभेत खोतकर यांना पराभवाचे तोंड पहावे लागल्याने त्या पराजयाचे खापर दानवे यांच्यावर फोडले गेल्याने या वादात अजूनच भर पडली.

अर्जुन खोतकर दिल्लीहून परतले; उद्या फोडणार ‘बॉम्ब’!, चेहरा पडलेला, कार्यकर्त्यांना म्हणाले…
गेल्या काही दिवसात ED ची छापेमारी झाल्यावर खोतकर यांचे राजकीय अस्तित्व संपते की काय असे दिसत असतानाच खोतकर दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले. तिथेच रावसाहेब दानवे आणि खोतकर दोघांतील वाद शिंदेंच्या मध्यस्थीने सुटला खरा, पण तिथेच खोतकर यांनी यावेळेस लोकसभेचे तिकीट आपणास देण्यात यावे अशी मागणी केली. तिथेच दानवे यांनी जालना ही भाजपचीच जागा असल्याचे ठासून सांगितल्याने पुन्हा या वादाला तोंड फुटते की काय याची चर्चा व्हायला लागली आहे.

अर्जुन खोतकरांचा शिंदे गटाला पाठिंबा?; शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आंबेकर ठामपणे म्हणाले…
दानवे हे भाजपचे प्रस्थापित नेते असून मुख्यमंत्री शिंदे यांनी मध्यस्ती केल्याने आता दोघांपैकी कोण एक पाय मागे घेतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. खोतकर अद्याप शिंदे गटात गेल्याचे मान्य करत नसले तरी उद्या कुटुंबीय, जवळच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून उद्या सकाळी जालन्यात आपली भूमिका मांडणार असल्याचे खोतकर म्हणत आहे. परंतु ED ची कारवाई, दिल्ली दौऱ्यादरम्यान खोतकर यांची देहबोली शिंदे गटात सामील होण्याचे स्पष्ट संकेत देतेय.

शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर शिंदे गटात सामील होणार का?; स्वत: खोतकरांनी केले स्पष्ट
आता हे पाहायचे की दानवे नरमतात की खोतकर. दानवे लोकसभेची जागा सोडणार नाहीत अशी चर्चा आहे. याचा अर्थ भाजप मागे हटणार नाही आणि खोतकर उद्या शिंदे गटात सामील झाले तर पुढे खोतकरांचे राजकीय अस्तित्व काय हा कळीचा मुद्दा आहे. खोतकर यांचे राजकीय पुनर्वसन करणे ही भाजपची नक्कीच डोकेदुखी ठरणार हे मात्र खरे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here